Nigdi : ‘झाडे तोडणा-यांना किरकोळ दंड घेऊन सोडते; मी पालिका माझी पाठ थोपटा’

वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारी यमुनानगरमधील अनोखी पर्यावरण रॅली

एमपीसी न्यूज – ”मी पालिका, माझी पाठ थोपटा, लाखो रुपये किमतींची झाडे तोडणाऱ्यांना किरकोळ दंड घेऊन मी (पालिका) सोडून देते आणि तेही लाकडा सहित, माझे कौतुक करा !” हा संदेश घेऊन प्रत्येक दुकानदारकडून पालिकेची पाठ थोपटून घेणा-या यमुनानगरच्या पर्यावरण रॅलीतील प्रतिकात्मक गाढवाने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते.   

जगा व जगू द्या  अभियानाअंतर्गत यमुनानगरमध्ये वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारी अनोखी रॅली काढण्यात आली. या रॅलीत मी पालिका माझी पाठ थोपटा असा फलक घेऊन पालिकेचे प्रतिकात्मक गाढव सामील झाले होते. डॉ. संदीप बाहेती यांच्या संकल्पनेतून ही रॅली साकारली. रॅलीत बालचमूंनी उत्सहात सहभाग घेत घरोघरी जाऊन वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती केली. या रॅलीत सचिन शिंदे, निसर्ग मित्र जगदीश मुंदडा, प्रदीप शाळिग्राम, पिंपरी-चिंचवड भूलतज्ज्ञ संघटनेचे प्रेसिडेंट डॉ. सुमित लाड आणि सहकारी डॉ. लहू खैरे, गणेश नजन महेश प्रोफेशनल फोरमचे प्रेसिडेंट अभिषेक सदानी आणि सहकारी, महेश सांस्कृतिक मंडळ पदाधिकारी सिध्दार्थ बाहेती, अभिषेक वाळके, हृषिकेश कोंढाळकर, ओमकार खंडळकर, गणेश तिवारी, दीप भंगाळे. रोहित शाळीग्राम, भालचंद्र बांगल आणि बाल मंडळीतील सिद्धार्थ, अभिषेक, हृषिकेश, ओमकार, गणेश, दीप, रोहित, भालचंद्र, कार्तिक इतर बाल मंडळी आणि इतर निसर्ग मित्र उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे बालचमुंनी दिलेल्या ज्येष्ठ जागे व्हा आम्ही झाडे लावतो तुम्हीही लावा हा संदेश.  याचबरोबर या रॅलीमध्ये पथनाट्य देखील सादर केले. या पथ नाट्यात मारुती राया काही केल्या पूजा स्वीकारत नव्हते ! भक्तांनी मनधरणी केल्यावर भक्तांची कान उघाडणी करताना मारुतीराया म्हणत होते “मूर्ख माणसा, मला प्रसन्न करावयाचे असेल तर मी निसर्गाच्या माध्यमातूनच होणार आणि तुम्ही निसर्गचं ठेवला नाही ! मला प्रसन्न करण्याचे माध्यमच तुम्ही ठेवले नाही! मी कसा प्रसन्न होऊ? आणि मग भक्त निसर्ग संवर्धनाचे अभिवचन मारुती रायाला देत होते ! देव नाही दगडात वास करतो झाडात ! मंदिरे नाही झाडे वाचवा ! या घोषणांनी आकाश दुमदुमून जात होते आणि मारुती राया प्रसन्न होत होते. तसेच अंत्य विधीसाठी विद्युत दहिनीचा वापर करा हा संदेश सुद्धा या रॅलीतून देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.