Pimpri : रुबेला लसीचं 18 वर्षानंतर झालं सार्वत्रीकरण

एमपीसी न्यूज – अपंगत्व प्रतिबंध प्रकल्प राबवून रुबेला आजारावर मात करण्यासाठी लसीची आवश्यकता असल्याचे प्रथम 1998 साली निदर्शनास आले. पुणे, कोल्हापूर, सातारा, जालना या जिल्ह्यांमध्ये ही लस प्रायोगिक तत्वावर देण्यात आली. के.ई.एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर येथे कार्यरत असताना डॉ. व्यंकटेश मारुतीराव तपशाळकर यांनी ही मोहीम सुरु केली. त्या मोहिमेनंतर त्यांनी रुबेला लसीचे सार्वत्रीकरण करण्याचा निष्कर्ष केंद्र सरकारकडे पाठवून दिला. मात्र सुरुवातीला या लसीचे सार्वत्रीकरण करणे शक्य नसल्याचे कारण केंद्राकडून सांगण्यात आले. सुमारे 18 वर्षानंतर या लसीचे आरोग्य विभागाला सार्वत्रीकरण करावे लागले. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. तपशाळकर यांनी एकंदरीत आजार आणि आजाराशी लढणारी प्रतिपिंडे (गोवर रुबेला संदर्भात) यावर सांगितलेल्या काही महत्वपूर्ण गोष्टी लेख स्वरूपात.

निसर्गात प्राणीमात्राचे स्वास्थ्य, आरोग्य हे शरीरात बाहेरील जंतू किती प्रमाणात गेले यावर अवलंबून असते. रोगाचे जंतू शरीरात गेल्यानंतर प्राणीमात्राचे शरीर स्वरंक्षणात्मक कार्यवाही सुरु करते आणि रक्तात प्रतिपिंडे (antibodies) तयार होतात. ही प्रतिपिंडे शरीरात प्रवेश केलेल्या जंतूंचा विविध पध्दतीने नायनाट करण्याचा प्रयत्न करतात. ही प्रक्रिया होत असताना मानवी शरीराला ताप येणे, अंग दुखणे, डोके दुखणे आदी विविध प्रकारची लक्षणे दिसतात. तयार झालेली प्रतिपिंडे सातत्याने आजाराच्या जंतूंवर हल्ला करत असतात. प्रतिपिंडे तयार होण्यास शरीरास काही कालावधी लागतो. शरीरास जंतूंपासून संरक्षण देण्यास पुरेशी प्रतिपिंडे तयार झाली की शरीरात प्रवेश केलेल्या जंतूंचा नायनाट होतो आणि मानवी शरीरातील आजारपण जाते. जेवढ्या कमी कालावधीत जास्तीत जास्त प्रतिपिंडे तयार होतील तेवढ्या लवकर रुग्ण आजारातून मुक्त होतो. तयार झालेली काही प्रकारची प्रतिपिंडे शरीरात कायम राहतात तर काही आजारात तयार झालेली प्रतिपिंडे ठराविक कालावधी पर्यंतच टिकून राहतात. ज्या आजारात तयार झालेली प्रतिपिंडे कायम टिकून राहतात, तो आजार त्या व्यक्तीस परत होत नाही.

निसर्गाच्या या अद्भुत गुणधर्माचा शास्त्रज्ञांनी बारकाईने अभ्यास करुन प्राणीमात्राच्या शरीरात प्रतिपिंडे तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश देखील मिळाले. शरीरात प्रतिपिंडे तयार करायची असतील तर शरीरात जंतु व संबंधित आजाराचे जंतु निसर्गत: असणे किंवा प्रयोगातून शरीरात सोडणे आवश्यक आहे. हे करत असताना व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून विविध आजाराच्या जंतुवर प्रक्रिया करुन जंतुची रचना न बदलता फक्त आजार – रोग होण्याची त्यांनी क्षमता कमी करुन लस तयार केली जाते.

ही लस जेव्हा दिली जाते तेव्हा कमजोर केलेले जंतु शरीरात मर्यादित प्रमाणात सोडले जातात. शरीर या जंतुविरुध्द प्रतिपिंडे तयार करते व ही प्रतिपिंडे रक्तात विविध कालावधीसाठी टिकून राहतात. ही प्रतिपिंडे नवीन प्रवेश केलेल्या रोगाच्या जंतूंना मारतात. त्यामुळे त्या आजाराचे दुष्परिणाम टाळले जातात. कधी कधी प्रतिपिंडाचे प्रमाण वाढविण्यासाठी काही लसी ठराविक कालावधी नंतर परत द्यायला हव्या. त्यामुळे शरीरास कोणतेही नुकसान होत नाही. उलट त्याचा रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी फायदाच होतो. पण लस परत परत देणे शासनाला परवडत नाही. म्हणून कमीत कमी वेळा लस देऊन जास्तीत जास्त व्यक्तींना संरक्षण देण व्यवहार्य आहे.

नवजात बालकांना त्यांच्या आयुष्यभर घातक आजारापासून लढण्यासाठी शासनाकडून सार्वत्रिक लस टोचणीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही स्वागतार्ह बाब आहे. याचा प्रत्येकाने फायदा घ्यावा व आपल्या पाल्यांना काही घातक आजारांपासून सुरक्षित करावे. लसीचा काहीच त्रास होत नाही. ज्या काही तक्रारी एकीवात येतात. त्यास मॅनेजिरियल कारणे व काही अंशी शरीर जबाबदार असते.

पिंडे शरीर/ मती भिन्न गोवरची लस – गोवरची लस घेतली असली तरी परत जरुर द्यावी. त्यामुळे आपल्या पाल्याची गोवर विरुध्द प्रतिकार शक्ती (प्रतिपिंडे) वाढतील. आजारांपासून सुरक्षित राहतील हे निश्चित. आपल्या देशात गोवरामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शासनातर्फे दिली जाणारी लस आपल्या पाल्यासाठी बुस्टर म्हणून काम करेल व पाल्यात असलेली प्रतिपिंडे वाढतील. पाल्यास गोवर होण्यापासून संरक्षण मिळेल. गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. त्यामुळे गोवराच्या विषाणुवर जालीम औषध वैदयकिय शास्त्रात उपलब्ध नाही. आम्ही वैद्यकीय मंडळी तुमच्या पाल्याच्या शरीरात उपलब्ध असलेल्या प्रतिपिंडावरच अवलंबुन आहोत. म्हणून लस देऊन गोवरा विरुध्द शरीरात प्रतिपिंडाचे प्रमाण वाढविणे हाच एक उपाय आहे. गोवरातील न्युमोनिया बरा करणे फार कठीण आहे. ब-याच बालकांचे मृत्यु न्युमोनियामुळे होतात. पालकांनी शासनातर्फे उपलब्ध केलेली गोवराची लस परत न विसरता घ्यावी, असे कळकळीचे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे.

रुबेला लस (जर्मन गोवर लस जन्मत: येणारे अपंगत्व प्रतिबंध) – शासनाने 15 वर्षाखालील सर्व मुलामुलींना ही लस देण्याचा कार्यक्रम राबविण्याचे ठरवले व माझ्या स्वप्नाची पूर्ती झाली. आनंद झाला. 15 वर्षापूर्वी मला के.ई.एम.हॉस्पिटल संशोधन केंद्रातर्फे अपंगत्व बंध प्रकल्प राबविण्याची संधी मिळाली. पुणे, कोल्हापूर, सातारा, जालना या जिल्ह्यातील शाळांतून सर्व मुलामुलींना गोवर लस दिली. आपल्या देशात व सर्व प्रगतीशील देशात अपंग मुले जन्मण्याचे प्रमाण भयानक आहे. बालकामधील अपंगत्वाचे प्रमाण 10 टक्के आहे. मतिमंद, कमी बुध्यांक, स्लो लर्नर, वेडसर, मुकी-बहीरी मुले, तोतरी, बोबडी व बोलण्यात दोष असलेली कमी दृष्टी, अंध अशी जन्मापासूनच असलेली मुले याचे प्रमाण जास्त आहे. त्यांना समाज प्रवाहात आणणे भारतासारख्या देशाला कठीण जात आहे.

यावर शहाणपणाचा एकच उपाय म्हणजे आपल्या मुलींना मुल होण्याचे अगोदर (15 वर्षांपर्यंत) जर्मन गोवरची लस देऊन मुलींच्या रक्तात जर्मन गोवरच्या विरुध्द प्रतिपिंडे तयार ठेवल्यास माता भगिनींना गरोदर पणात जर्मन गोवर होणार नाही. कारण गरोदरपणात जर्मन गोवर झाल्यास होणारे अपत्य अपंग जन्मते. प्रगत देशात मुलींना 5 वर्षापूर्वी व नंतर 12 व्या वर्षी जर्मन गोवरची लस दिली जाते. जर्मन गोवरची लस टोचणे म्हणजे जन्मत: येणा-या अपंगत्वाचा प्रतिबंध करणे होय. जर्मन गोवर जन्मत: येणारे अपंगत्वाचे मुख्य कारण आहे. 15 वर्षापूर्वी अपंगत्व प्रतिबंध कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचे अपंग कल्याण आयुक्त व भारताचे अपंग कल्याण आयुक्त (चीफ कमिशनर) दिल्ली यांच्याशी चर्चा करुन मी जर्मन गोवर लस ही सर्व मुलींना देण्यात यावी अशी विनंती केली होती. तत्वत आमची सूचना मान्य केली. मात्र तूर्तास ते शक्य नाही, असे चर्चेमध्ये सांगितले. पण त्यानंतर 18 वर्षांनी का होईना रुबेला लसीचे सार्वत्रिकरण होत असल्याचा आनंद होत आहे. याचा पालकांनी शंका, कुशंका बाजूला ठेवून आवश्य लाभ घ्यावा.

डॉ.व्यंकटेश मारुतीराव तपशाळकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.