Pimpri News : अज्ञात आरोपींकडून पिंपरी- चिंचवडमध्ये 15 ते 20 वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – पिंपरी- चिंचवड शहरामधील पिंपळे सौदागर आणि राहटणी परिसरात अज्ञात टोळक्याने 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली आहे. (Pimpri News) कोयते आणि सिमेंट च्या गट्टूनी वाहनांची तोडफोड केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. टोळक्याला अडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अज्ञातांनी धक्काबुकी केली असून ते रिक्षातून फरार झाले आहेत. या घटनेने नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरात दहशत पसरली आहे.
नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी- चिंचवड शहरातील गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्याची हद्द असलेल्या राहटणी आणि पिंपळे सौदागर येथे मध्यरात्री एकूण 15 ते 20 वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. शनिवारी 31 डिसेंबर असल्याने शहरात दीड हजारापेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त होता. तरी देखील अज्ञात चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिक्षातून येऊन दिसेल त्या दुचाकी, चारचाकी ला लक्ष करत कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड केली आहे.
Pimpri News : ऑनलाईन मागवलेली ऑर्डर रद्द करणे पडले महागात
तोडफोड करणाऱ्या टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न वाकड पोलीस कर्मचाऱ्याने केला पण त्यांना धक्काबुकी करून अज्ञात तोडफोड करणारे व्यक्ती पसार झाले आहेत.(Pimpri News) याबाबत सांगवी आणि वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.
4 ते 5 तरुणांनी रिक्षातून फिरून पिंपळे सौदागर व राहटणी मधील विविध भागात 50 ते 60 गाड्यांच्या काचा फोडून नव वर्षाच्या पहिल्या दिवशी दहशत माजवली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नेमक्या किती वाहनांच्या काचा फोडल्या याचा आकडा पोलिसांनी सांगितला नाही. पण प्राथमिक तपासात 15 ते 20 वाहनांच्या काचांची तोडफोड केली असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच पुढील तपास चालू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवड परिमंडळ 2 चे उप आयुक्त, काकासाहेब डोळे म्हणाले की, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येईल व त्यांना कठोर शिक्षा केली जाईल.
वाकडचे सहाय्यक पोलीस आयुक्त, श्रीकांत देसले म्हणाले की, “ही घटना आज पहाटे 2 वा च्या सुमारास घडली आहे.10 ते 15 मिनिटात आरोपी सुसाट रिक्षात फिरले व विविध भागात रस्त्याचे कडेला असलेल्या गाड्यांच्या काचांची तोडफोड केली आहे. (Pimpri News) त्यांनी वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मध्ये 10 ते 15 वाहनांच्या काचा फोडल्या आहेत तर सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाच ते सहा वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. राहटणी फाट्या जवळील गोडांबे कॉर्नर जवळ पेट्रोलिंग करणाऱ्या हवालदार रावते यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या तरुणांनी त्यांच्यावर दगड फेक केली व रिक्षाने सुसाट पुढे निघून गेले. पोलिसांनी पाठलाग केला तेव्हा त्यांनी रिक्षा कासरवाडी स्म्शानभूमी जवळ सोडून ते पळूण गेले.”
‘सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस त्या तरुणांचा शोध घेत आहे. त्या तरुणांनी सिमेंटचे गट्टू फेकून रस्त्याच्या कडेला रात्री पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. या वाहनांमध्ये बस, रिक्षा, टेम्पो व कार यांचा समावेश आहे. त्यांनी कोणत्याही नागरिकाला जखमी केली नाही”, असे देसले म्हणाले.
याबाबत माहिती देताना, सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव म्हणाले की 31 डिसेंबर व 1 जानेवारी च्या रात्री पुर्ण पिंपरी चिंचवड शहरात बंदोबस्त व नाकाबंदी होती. तरीही या गावगुंडांनी पिंपळे सौदागर व राहटणी मधील विविध भागात 50 ते 60 गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवली. पोलिसांचा वचक राहिला नसल्याने हे प्रकार घडत आहेत.”
जाधव पुढे म्हणाले की, “आज पहाटे 2 वा ते 2.30 वा चे दरम्यान 4 ते 5 तरुण रिक्षाने फिरून पिंपळे सौदागर व राहटणी मधील विविध भागात 50 ते 60 गाड्यांच्या काचा फोडून नव वर्षाच्या पहिल्या दिवशी दहशत पसरवत होते. ही रिक्षा चोरीची होती व मालकाने रिक्षा चोरी प्रकरणी तक्रारही पोलिसांकडे यापूर्वीच दाखल केली होती. रहाटणी फाटा येथून ही रिक्षा पुढे जात असताना त्या तरुणांनी रोडच्या कडेला पार्क केलेल्या कार व रिक्षा यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर रामनगर, पिंपळे सौदागर मधील कोकणे चौकातून राहटणी गावाकडे गेले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक कडून पिंपळे सौदागर पोलीस चौकी कडे जाताना जीप, रिक्षा, दोन सेंट्रो कार, एक स्विफ्ट कार यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर पिंपळे सौदागर पोलीस चौकी कडून राहटणी च्या महादेव मंदिराकडे गेले. तेथे त्यांनी 2 बस, टेम्पो, व्हॅन व रिक्षांच्या काचा फोडल्या.”

