Unlock 4.0 : देशात 30 सप्टेंबरपर्यंत शाळा महाविद्यालये बंद राहणार, सरकारची अनलॉक 4.0 नियमावली जाहीर

एमपीसी न्यूज – देशात अनलॉक अंतर्गत विविध आस्थापना सुरू केल्या जात आहेत. 1 सप्टेंबर पासून देशात अनलॉक 4.0 लागू होत असून त्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. अनलॉक 4.0 मध्ये सास्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तर शाळा व महाविद्यालये सप्टेंबर अखेरपर्यंत बंदच राहणार आहेत. यासाठी सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 4.0 ची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार देशात कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबर पर्यंत लाॅकडाऊनचे नियम तसेच राहणार आहेत. नव्या नियमानुसार देशात सात सप्टेंबर पासून मेट्रो रेल्वे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शंभर लोकांच्या उपस्थितीसह राजकीय, मनोरंजन, खेळ, धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांना 21 सप्टेंबर पासून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी मास्क, सोशल डिस्टंसिंग, थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश, सॅनिटायझर या गोष्टींचा वापर बंधनकारक राहणार आहे.

कंटेनमेंट दोन बाहेरील नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची परवानगी राहणार आहे. मात्र यासाठी त्यांच्या पालकांचे ना हरकत पत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.

विशेष म्हणजे कंटेनमेंट झोनच्या बाहेर लाँकडाऊन लावण्याचा अधिकार आता राज्य सरकारांना राहणार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतरच असा लाँकडाऊन लावता येणार असल्याचे नव्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक यांना 30 सप्टेंबरपर्यंत बंदी राहणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.