Unlock 5.0 : चित्रपटगृहात मास्क बंधनकारक, 15 ऑक्टोबरपासून सुरु होणा-या चित्रपटगृहासाठी केंद्राची नियमावली

एमपीसी न्यूज – अनलाॅक 5.0 अंतर्गत केंद्र सरकारनं देशभरात चित्रपटगृहं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहं सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं नियमावली जाहीर केली आहे.

चित्रपटापूर्वी कोरोना संदर्भात जनजागृती करणारी एका मिनिटांची शॉर्ट फिल्म अथवा एक घोषणा करणं अनिवार्य आहे. तसंच ऑनलाइन तिकिट आरक्षित करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

‘गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार 15 ऑक्टोंबर पासून देशात चित्रपटगृहं, मल्टीप्लेक्स सुरू होणार आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे आणि 50 टक्के क्षमतेनं त्यांना परवानगी देण्यात आली आहे, असं जावडेकर म्हणाले.

हे नियम पाळावे लागणार

चित्रपट सुरू होण्यापूर्वी कोरोना संदर्भात जनजागृती करणारी एका मिनिटांची शॉर्ट फिल्म जनजागृतीसाठी दाखवणं बंधनकारक असेल.

चित्रपटगृहातील प्रत्येक व्यक्तीला मास्क परिधान करणं बंधनकारक आहे.

सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं.

चित्रपटगृहात थुंकण्यास मनाई.

ज्या जागी प्रेक्षकांना बसता येणार नाही त्या आसनांवर खुणा केलेल्या असाव्यात.

प्रेक्षकांना आरोग्य सेतू ॲपचा वापर करण्याचा सल्ला द्यावा.

मध्यांतरामध्ये प्रेक्षकांना इतरत्र जाणं टाळावं.

सातत्यानं साफसफाई आणि सॅनिटायझेशन केलं जावं.

प्रेक्षकांना आवश्यकता असल्यास पॅकेज फूडचा देण्यात यावं.

एक सीट सोडून दुसऱ्या व्यक्तीला चित्रपटगृहात बसावं लागणार आहे.

आवश्यकता भासल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रेक्षकांचे फोन क्रमांक घ्यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.