Unlock News: पुणे व पिंपरीतील महाविद्यालये सोमवार ऐवजी मंगळवारपासून सुरु, रेस्टॉरंट व बारच्या वेळेची मुदत वाढविली

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यामांच्या महाविद्यालयांचे नियमित वर्ग मंगळवार (दि.12) पासून सुरू होणार आहेत.  कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांत प्रवेश मिळणार आहे. तसेच उपहारगृहे, रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट हे आठवड्यातील सर्व दिवस रात्री 11 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथील केले जात आहेत. राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. घटस्थापनेपासून मंदिर खुली केली आहेत. आता मंगळवारपासून महाविद्यालयांचे नियमित वर्ग सुरु होणार आहेत.  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस अनिवार्य केले आहेत. महाविद्यालयात मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन अशा कोरोना नियमांचे पालन बंधनकारक केले आहे.

सर्व कोचिंग क्लासेस आणि प्रशिक्षण संस्थेच्या हॉलच्या आसनक्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. तेथील प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांनाचेही दोन डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. याशिवाय शासकिय आणि खाजगी कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. सर्व कर्मचा-यांचे कोविड लसीकरणाचे दोन डोस पूर्ण करणे आवश्‍यक आहे.

शहरातील उपहारगृहे, रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट हे आठवड्यातील सर्व दिवस रात्री 11 वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेने सुरू राहणार आहेत. तर, पार्सल सेवा, घरपोच सेवा रात्री 12 वाजेपर्यंत मिळणार आहे.

‘या’ कारणामुळे महाविद्यालय सोमवारी सुरू होणार नाही, पालिकेने दिली पुढची तारीख 

पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत दिली होती. पण आता शहरातील महाविद्यालये मंगळवारी सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

लखीमपूर खेरी हत्याकांडाचा निषेध म्हणून सोमवारी (11 ऑक्टोबर) राज्यातील महाविकास आघाडीसोबत, शेतकरी संघटना आणि विविध कामगार संघटनांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. यामुळे सोमवारी विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचणी येऊ शकतील म्हणून महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

तसेच विद्यार्थिनींसाठी पुणे महापालिकेमार्फत थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी लवकरच महापालिका विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.