Blog by Harshal Alpe: महालक्ष्मी एक्सप्रेसचा तो न विसरता येणारा प्रवास!

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) – काल रात्री टी व्ही वर सहज बातम्या बघत असताना त्या बातम्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौर्‍याबद्दल आणि पोलिसांशी चाललेल्या संघर्षाबद्दल वार्तांकन सुरू होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ट्रेन पकडायला जाणार्‍या सोमय्या यांना पोलिस ट्रेन पकडण्यासाठी मज्जाव करत होते. शेवटी अनेक प्रयत्नांती सोमय्या ट्रेन पर्यंत पोहोचले आणि बोगीत आपल्या जागेवर बसले, तेवढ्यात महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली.

वृत्तांकन लाईव्ह दाखवत असल्याने प्रत्येक येणारे स्टेशन हे एक ब्रेकिंग न्यूज बनत होते आणि पाहाणाऱ्याला हा एक प्रकारे प्रवासच (तो ही फुकट ) घडत होता. रात्रभरात आपण कोल्हापूरपर्यंत पोहोचणार ते ही घर बसल्या टी व्ही वरच्या ट्रेन ने ,या भावनेने शाहारून गेलो आणि शेवटी टी व्ही बंद करून बिछान्यावर आणि मनाने ट्रेन च्या वरच्या बर्थ वर झोपी गेलो पण मन पटलावर मी ही सोमय्या यांच्या बरोबर त्याच ट्रेन मध्ये होतो, हे विशेष …

खरंतर, महालक्ष्मी एक्सप्रेसचा तो वृत्तांकन रूपी प्रवास खूप आठवणींना जागे करत होता , कोणे एके काळी (आता एके काळी म्हटलं पाहिजे , 2018 ते 2019 च्या त्या नियमित काळाला इतिहास रूपचं प्राप्त झालंय ) मी मुंबई – पुणे रोज अपडाऊन करत होतो. सकाळी नांदेड – पनवेल ट्रेन किंवा फार फार तर सह्याद्री एक्सप्रेसने तळेगावहून मुंबईला जायचे आणि रात्री पुन्हा सह्याद्री (6 वाजता ची ) किंवा फार उशीर झाला तर महालक्ष्मी (8.30 वाजता ) ने परतीचा प्रवास व्हायचा .

खिशात नेहमी मुंबई – पुणे मासिक पास असल्याने आपण राजेच आहोत असा उगाचच भास व्हायचा त्यामुळे आपल्याला कुणी ही अडवू शकत नाही, असा नेतेपणा मिरवतच प्रवास करायचो. मुंबईहून पहिल्या स्टॉप वरुन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन गाडी सुटायच्या अर्धा एक तास आधीच गाडीत जाऊन जागा पकडणे हे एक विशेष भूषण होते , कधी कधी आरक्षित जागा कुठली ? हेच माहीत नसल्याने नक्की आपल्याला कुठल्या स्थानकावर आपली जागा सोडावी लागणार , या बद्दल साशंकता असायचीच!

खरतंर या उत्सुकतेची तुलना कालच्या माध्यमांच्या सोमय्यांबद्दल च्या प्रवासाच्या वृत्तांकनात होती . माध्यमसुद्धा प्रत्येक स्टेशन वर किरीट सोमय्या उतरणार का ? या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते , माझ्या अनुभवात मी सोमय्या यांच्या जागी असायचो. फक्त माझा प्रवास दर वेळी लोणावळा या स्थानकापर्यंतच असायचा .

एकदा असेच महालक्ष्मी एक्सप्रेस ने प्रवास सुरू केला , मी ज्या बोगीत बसलो होतो तिथे विशेष गर्दीच नव्हती , मनात जागेबद्दल आणि खिडकी बद्दल बसायला सहज मिळाल्याने उगाचच एक धाकधूक होतीच . स्टेशनामागून स्टेशन येत होती – जात होती , कुणीच फारसे डब्यात येत नव्हते त्यामुळे भीतीचे रूपांतर आश्चर्यात होत होते. आसपास काही तुरळक पोलिस आणि काही कार्यकर्ते आणि काही सफारी धारक मंत्रालय कर्मचारी एवढेच लोक होते. ते माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे करतच होते. त्या संपूर्ण वातावरणात गटात न बसणारा शब्द म्हणजे मी पोरस वजा मी होतो.

एक दोघांशी बोलताना उगाचच मी पत्रकारितेचा विद्यार्थी आहे , असे उगाच आगाऊपणे सांगितले. पण गंमत अशी की  त्यांनी त्याची काहीच दखल ही घेतली नाही , फक्त कुठे उतरणार ? या पलीकडे एक ही प्रश्न त्यांनी मला विचारला नाही. कोणी तरी मोठे नेते आमच्या बाजूच्या बोगीत आहेत आणि त्यांचे सुरक्षागार आणि कार्यकर्ते , समर्थक एवढेच त्या दोन डब्यात आहेत , आणि इतर कुणाला ही साहेब असलेल्या बोगीत आणि या बोगीत येऊ न देण्यासाठी तब्बल दोन बोग्यांचे आगाऊ आरक्षणच या नेते महाशयांनी केलेले होते , हे मला नंतर कळले. मात्र माझ्यावर दया दाखवून त्यांनी मला बसायला दिलेले होते. शिवाय माझा हा प्रवास  लोणावळा स्थानकापर्यंतच असल्याने त्यांना तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. अखेर 11 ते 11.30 च्या आसपास मी लोणावळ्याला उतरलो, लगेचच त्यांनी दारं खिडक्या लाऊन घेतल्या आणि ट्रेन निघून गेली.

हा प्रवास जरी सुरळीत आणि व्हीआयपी पद्धतीने झाला असला तरी संघर्ष हा पुढे होताच कारण महालक्ष्मी एक्सप्रेस आणि लोकलचे गणित हे त्या दिवशी बिघडलेले होते , त्यामुळे एक्सप्रेस येण्याआधीच त्याच्याशी निगडीत असलेली लोकल मात्र आधीच गेलेली होती आणि इतका छान झालेल्या प्रवासानंतर त्या लोणावळा स्थानकात मी असुरक्षितेच्या भावनेने अधिकच ग्रासलो होतो.

दरम्यान, फोन बंद पडला होता त्यामुळे घरच्यांशी काहीच संपर्क नव्हता. तासभर तसाच बसून राहिल्यानंतर पंढरपूर येथे जाणारी पेसेंजर गाडी आली जी पूर्ण भरलेली होती पण तरीही त्यात कसा तरी घुसून जीव मुठीत घेऊन तळेगावला उतरलो . ट्रेनच्या अफाट गर्दीने आधीचा झालेला व्ही आय पी प्रवास पार पुसून टाकला होता . तो आज या निमित्ताने उजागर झाला.

खरं तर कधी ही महालक्ष्मी एक्सप्रेस म्हटलं की मला हाच प्रवास आठवतो, त्यानंतरचा तो एक तास लोणावळ्यात वेळ घालवलेला ही आठवतो मात्र आता तो पंढरपूर गाडीतला प्रवास मात्र आठवत नाही. नेत्यांबरोबरचा तो ट्रेनचा तो थाटच वेगळा होता आणि माझ्या सामान्यपणामुळेच मला तो जास्त भिडला होता . महालक्ष्मी एक्सप्रेसशी माझे हे असे व्ही आय पी  चे नाते या नंतर ही अनेक वेळेला झाले होते , त्यामुळेच मला ती ट्रेन जास्तीच व्ही आय पी वाटली होती आणि कालच्या त्या बातमी ने महालक्ष्मी एक्सप्रेस चे माहात्म्य अधिकच वाढले.

इतकेच ….!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.