Pimpri News: ‘रेमडेसिवीर’चा अनावश्यक वापर, बेडसाठी अधिकचे शुल्क; भरारी पथक  रुग्णालयांची  ‘अचानक’ तपासणी करणार

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी परवानगी दिलेल्या खासगी रुग्णांलयामध्ये गंभीर त्रुटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी परवानगी दिलेल्या खासगी रुग्णालयात ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा अनावश्यक वापर वाढला आहे. परिणामी, आवश्यक रुग्णांना वेळेवर इंजेक्शन मिळत नाही. बाजारामध्ये थेट पध्दतीने विक्रीस मनाई असताना नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन आणायला लावले जाते. त्यामुळे काळाबाजारास संधी प्राप्त होत असून बनावट रेमडेसिवीर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच बेड उपलब्ध करून देतानाही हेतुपुरस्सर बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यानंतर अधिकचे शुल्क आकारून बेड दिला जात असल्याच्या  तक्रारी आल्याने त्यावर  नजर ठेवण्यासाठी  भरारी पथक तयार केले असून पथक अचानक भेट देऊन रुग्णालयांची तपासणी करणार आहे.

या कामकाजावर  सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांचे समन्वय अधिकारी म्हणून नियंत्रण राहणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. त्यामुळे नव्याने खासगी रुग्णालयांना देखील कोरोनाच्या रुग्णांनावर उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. या  कोविड रुग्णांलयामध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे.

‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा अनावश्यक वापर वाढल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे शासनाकडून पुरवठा होणारा, मर्यादित साठा आणि मोठ्या प्रमाणावरील  अनावश्यक वापर यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या  रुग्णांना तातडीने रेमडेसिवीर इंजेक्शन देणे गरजेचे आहे. त्यांना वेळेवर मिळत नाही. यासाठी रुग्णांचे नातेवाईक, नगरसेवक, पदाधिकारी यांचा सातत्याने पाठपुरावा असून मागणीत वाढ होत आहे.

बाजारामध्ये कुठेही थेट पध्दतीने विक्रीस मनाई असताना अनेक खासगी रुग्णालयांमार्फत उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना  इंजेक्शन बाहेरून आणण्यासाठी प्रेस्क्रिपशन देण्यात येते. त्यामुळे रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना संधी मिळत असून बनावट रेमडेसिवीर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध करून देतानाही हेतुपुरस्सर बेड उपलब्ध नसल्याचे प्रथमतः सांगण्यात येते. त्यानंतर अधिकचे शुल्क आकारून अथवा विशिष्ट व्यक्तींनाच बेड उपलब्ध करून देण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी परवानगी घेताना दाखविण्यात आलेल्या सोई-सुविधा, मनुष्यबळ परवानगी मिळाल्यानंतर उपलब्ध आहे किंवा नाही. याबाबतची खातरजमा केली जाणार आहे. तसेच कोरोनामुळे मृत रुग्णांचे पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य महापालिकेमार्फत मोफत पुरविण्यात येते. परंतु, स्मशानभूमीत पैसे मागितले जात असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत.

त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आलेल्या खासगी रुग्णालयात ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा गरज असलेल्या रुग्णांसाठीच वापर होत आहे का, अनावश्यक वापर होत नाही ना, याची महापालिकेमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. इंजेक्शनचा प्राप्त साठा, झालेला वापर तपासण्यासाठी रुग्णालयातील वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून अनियंत्रित वापर करणाऱ्या रुग्णालयांवर कार्यवाही करण्यासाठी बेडची संख्या, उपलब्धता, दैनंदिन डिस्चार्ज यासाठी सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्या नियंत्रणाखाली नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची भरारी पथकामध्ये कामकाज करण्यासाठी नियुक्ती केली आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अचानक भेटी देऊन रुग्णांलयामध्ये तपासणी करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

अंत्यसंस्कारासाठी पैशांची मागणी केल्यास फौजदारी कारवाई

कोरोनामुळे मृत रुग्णांचे पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही अशा आशयाचा फलक स्मशानभूमीच्या दर्शनी भागात लावण्याची कार्यवाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तातडीने करावी. कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी करणे अथवा तशी तक्रार येऊ नये यासाठी महापालिकेच्या सुरक्षा विभागाने स्मशानभूमीमध्ये अचानक गस्त घालून पाहणी करावी. अशा प्रकारचे गैरकृत्य करताना आढळून आल्यास, तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर तात्काळ फौजदारी कारवाई करावी, असे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.