Lonikand : केसनंद येथील विहिरीतील गाठोड्यात आढळलेल्या मानवी सांगाड्याचे गुढ उलगडले

पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीनेच केला खून; 48 तासात लावला छडा

एमपीसी न्यूज – पुण्याजवळील केसनंद-थेऊर रस्त्यावरील विहिरीतील गाठोड्यात सापडलेल्या मानवी हाडांच्या सांगाड्याचे गुढ उलगडले आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासात गुन्ह्याचा छडा लावला. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीनेच खून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

शिलाबाई राजू सुतार (स्वामी) असे सांगाडा सापडलेल्या महिलेचे नाव आहे. तर पती राजू सातप्पा सुतार याला पोलिसांनी सातारा येथून अटक केली आहे.

लोणिकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद गावचे पोलीस पाटील पंडीत हरगुडे यांनी एका विहिरीत हे गाठोडे सापडल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता विहिरीतील एका कोपऱ्यात दगड बांधलेले गाठोडे सापडले.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी ते बाहेर काढून पाहणी केली असता त्यामध्ये मानवी हाडांचा सांगाडा सापडला. सोबतच मंगळसूत्र आणि बांगड्याही आढळल्या. यावरून हे अवशेष महिलेचे असून वर्षभरापूर्वीचे असल्याचा अंदाज लावला होता. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा करून तपासाला सुरुवात केली होती. आणि अवघ्या 48 तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

तपासादरम्यान पोलिसांच्या डीबी पथकाला माहिती मिळाली की केसनंद-तळेरानवाडी येथे बाळासाहेब वाळके यांच्याकडे खोली करून राहणा-या राजू सुतार याची पत्नी अचानक गायब झाली होती. व त्यानंतर राजू हा देखील सर्व सामान घेऊन गावी निघून गेला होता.

पोलिसांचा राजू याच्यावर संशय बळावला. त्यांनी सोलापूर येथील त्याच्या कुंभारी या गावी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता. त्याने गुन्हा कबूल केला. मयत पत्नी शिलाबाई ही गेल्या दोन वर्षापासून कॅन्सरने पीडित होती. त्यावर उपचार करणे राजूला शक्य होत नव्हते. सततच्या औषधांच्या खर्चाला कंटाळून अखेर त्याने शिलाबाईचा खून केला. नंतर तिचे हातपाय बांधून तिला गाठोड्यात दगडासह बांधून जवळच असणा-या विहिरीत टाकून दिले.

दगडासह विहिरीत टाकल्याने ते तळाला बसून तिथेच खाली कुजले. मात्र नंतर काही दिवसांनी हे गाठोडं हलके झाल्याने वर आले आणि त्यात हाडांचा सांगाडा आढळला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.