BNR-HDR-TOP-Mobile

नवोदित दिग्दर्शकाला कुणी निर्माता मिळेल का ?

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- एक नवोदित दिग्दर्शक चित्रपटाची संहिता घेऊन दारोदार फिरतोय पण त्याला कुणी निर्माताच मिळत नाहीये. नामवंत दिग्दर्शकाची निर्मात्यांची रांग लागलेली असते पण एखादा नवोदित दिग्दर्शक स्वतःकडे दिग्दर्शकीय कौशल्य असून देखील, डोळ्यासमोर एक व्हिजन असूनही निर्माता मिळवण्यासाठी त्याला अनेकांचे दरवाजे ठोठवावे लागतात हे शोकांतिका म्हणावी लागेल.

निर्माता म्हणून एखाद्या चॅनेलकडे जावं तर त्याठिकाणी अगोदरच अनेक चित्रपटांची भरपूर गर्दी झालेली. बर तिथे पोहोचण्यासाठी सुद्धा तगडा वशिला असल्याशिवाय गत्यंतर नाही. नवोदित दिग्दर्शक जेव्हा थोरामोठ्यांची चरित्र धुंडाळायला लागतो तेव्हा त्यात बाकीच्याच गोष्टी दिसतात. मात्र निर्मात्याला कस पटवायचं हे कुठेच दिसत नाही ? एखादा निर्माता भेटलाच तो अनेक कारणे पुढे करतो. तुमच्या कथेत दम दिसत नाही, कास्टचा प्रोब्लेम आहे, स्क्रीनप्ले सुद्धा कमजोर आहे अशी करणे सांगून त्या दिग्दर्शकाला वाटेला लावले जाते. आता मला सांगा,चालू चित्रपटांपैकी किती चित्रपट खरच चांगले असतात ? हा संशोधनाचा विषय ठरेल. पण एकदा नाव मिळेल की काहीही दिलेले प्रेक्षकांना चालते असा समज निर्मात्यांचा असतो.

मोठ्यां निर्माता दिग्दर्शकांचे चित्रपटही अनेक वेळा सुमार झाल्याचे आपण पाहतो. पण नाववाल्यांना सगळच माफ असत कारण त्यांनी नाव कमावलेलं असत . त्यामुळे ते कितीही बजेटवर खेळू शकतात. नवोदित दिग्दर्शक इथेच कमी पडतो. नाववाल्यांच्या चित्रपटाला तीन-तीन निर्माते पैसे घेऊन उभे असतात, आणि नवोदित दिग्दर्शकाला एक निर्माता मिळवताना कष्ट करावे लागतात. सगळ्या निर्मात्यांना एकाच चित्रपटासाठी निर्माता होण्याचा दृष्टांत कसा होतो ? हे देखील एक कोडेच आहे. एवढे करून एकापेक्षा अधिक निर्माते असलेला चित्रपट चालतो असे ,कुणीच शपथेवर सांगू शकत नाही .

चित्रपट निर्मिती क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळाला आहे. मात्र अजूनही काही बँका चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी कर्ज देत नाहीत. छोट्या मोठ्या बाकी उद्योगांना कर्ज दिले जाते पण चित्रपटांना नो एन्ट्री. पण काही मोठ्या चित्रपटांच्या श्रेय नामावलीत अर्थसाहाय्य म्हणून बँकांची नाव दिलेली असतात ते कस काय बुवा ! चित्रपटासाठी अर्थ साहाय्य मागायला गेल्यावर हात वर करणारी शाखा आठवते आणि नंतर एखाद्या टुकार चित्रपटाच्या श्रेय नामावलीत त्याच बँकेच नाव दिसत. काही वेळा नवोदित दिग्दर्शक अशाने त्रस्त होऊन राजकीय लोकांच्या पुढे पुढे करायला लागतात. त्यातून कधीतरी ते वेगळ्याच मार्गाला गेल्याची ही उदाहरणे आहेत. राजकीय मंडळींसाठी जाहिराती कर, प्रचार कर अशा गोष्टी सुरु होतात आणि त्यांच्यातील दिग्दर्शक हळू हळू मरून जातो. चित्रपट करायला सुद्धा त्यांना वेळ उरत नाही.

याच क्षेत्रातले मुरलेले लोक येऊ घातलेल्या निर्मात्याला आपल्या बोलण्यातून चांगलेच भरकटवतात. त्या निर्मात्याला चित्रपटात त्याला पैसे गुंतवायला भाग पाडतात. तो चित्रपट काही केल्या चालत नाही आणि तो निर्माता डूबतो. पुन्हा त्यावाटेला तो जात नाही. अशा व्यक्तींशी बोलल्यावर तो म्हणतो की हे क्षेत्रच वाईट हो ! या सर्व प्रकारामुळे आपल्या चित्रपट सृष्टीच नुकसान होत आहे. एखादा उद्योग तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तिथे समान संधी असते. त्या बाबतीत अजूनही आपण मागे आहोत हे आपल्याला मान्य करावेच लागेल.

हे चित्र बदललं पाहिजे. नवोदित दिग्दर्शकांना देखील इथे आपली कलाकृती मांडण्यासाठी समान संधी असायलाच हवी.प्रत्येक नवीन माणूस हा नवी संकल्पना घेऊन येत असतो. नवी दृष्टी तो आणू पाहत असतो. योग्य की अयोग्य हा वेगळा भाग असेल. पण याला ते मांडण्याचा पूर्ण अधिकार असलाच पाहिजे . फालतू तडजोडी न करता त्याच्या मनातील कलाकृती साकारायला पोषक वातावरण असलेच पाहिजे. तरच आपली मराठी चित्रपटसृष्टी पुढे जाईल

शेवटी इतकच…. पाठीवरती हात ठेवुनी फक्त लढ म्हणू नका तर पाठीशी खंबीरपाने उभे राहा. म्हणजे आपण सगळेच पडकी भिंत बांधू , मोठ घर बांधू

HB_POST_END_FTR-A2