Chinchwad News : शेतकरी सुखी तरच देश सुखी – प्रविण तरडे

आगामी सरसेनापती हंबीरराव मोहिते हा मराठीतील सर्वाधिक खर्चिक चित्रपट

एमपीसी न्यूज – ज्या देशातील शेतकरी वर्ग सुखी असेल तोच देश निश्चितपणे सुखी असेल. जर शेतकरीच दु:खी राहिला तर तो देश सुखी असू शकत नाही, असे स्पष्ट मत प्रसिध्द अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केले. सरसेनापती हंबीरराव मोहिते हा आगामी मराठी चित्रपट हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीस तोड असून मराठीतील सर्वाधिक खर्चिक चित्रपट झाला आहे, असेही ते म्हणाले.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने चिंचवड येथे खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते तरडे यांचा ‘दिशा कार्यगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर, मुलाखतकार विनोद सातव यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. दीड तास चाललेल्या या मुलाखतीच्या माध्यमातून तरडे यांंचा जीवनपट उलगडण्यात आला. ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर आनंद दिघे’ व ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ या त्यांच्या चित्रपटांविषयी तरडे यांनी पडद्यामागचे अनेक किस्से दिलखुलासपणे सांगितले.

शेती, प्रतिकूल परिस्थितील शेतकऱ्यांचे जगणे, राजकारण, मराठी चित्रपट क्षेत्र, महाराष्ट्राची थोर ऐतिहासिक परंपरा अशा विविध विषयांवर तरडे यांनी परखड मते मांडली. यावेळी व्यासपीठावर अभिनेते रमेश परदेशी, दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना शिवले, कार्याध्यक्ष राजू करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी अध्यक्ष गोरख भालेकर, सचिन साठे, संतोष निंबाळकर, नंदकुमार कांबळे उपस्थित होते. उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गोरख भालेकर व सचिन साठे यांचा तर करोना योध्दा म्हणून संतोष चांदेरे यांना तरडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

तरडे म्हणाले की, आतापर्यंत मी साडेचार हजार पेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत. संवाद कौशल्य हे सामाजिक आणि भौगोलिक आयुष्य कसं आहे यावर अवलंबून आहे. त्यामुळे माझ्या चित्रपटातील संवाद मला उस्फूर्तपणे सुचतात. माझ्या चित्रपटात मी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने मांडत आलो आहे. सलमान खानने केलेल्या हिंदी चित्रपटासह मुळशी पॅटर्नचा भारतातील सोळा भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आहे. येत्या २७ मे ला प्रदर्शित होणाऱ्या हंबीररावसाठी सर्वार्थाने खूप मेहनत घेतली आहे. आतापर्यंतच्या मराठी चित्रपटात सर्वाधिक खर्चाचा आणि मराठी चित्रपटाची दिशा बदलून टाकणारा हा सिनेमा ठरणार आहे. दाक्षिणात्य प्रेक्षक तेथील चित्रपटांच्या मागे ठामपणे उभा राहतो. हंबीरराव हा त्यांच्या तोडीचा चित्रपट बनलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती असलेल्या हंबीरराव मोहिते यांच्या संपूर्ण कुटुंबाची ही गोष्ट आहे. स्वराज्यासाठी ते पूर्ण कुटंब लढाईत उतरले. महिलाही मागे राहिल्या नाहीत.

तरडे म्हणाले, आई वडिलांच्या पुण्याईमुळे शेतकरी, वारकऱ्यांचे विषय मी प्रभावीपणे मांडू शकलो, कारण मी ते जीवन जगतो आहे. मी सर्वप्रथम शेतकरी आहे. सिनेमाच्या माध्यमातून शक्य तितक्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आहेत. यापुढेही शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने मांडत राहणार आहे. या देशात सगळे मिळेल पण शुद्ध अन्न मिळणार नाही. ते शेतकरीच देऊ शकणार आहे. त्यासाठी शेती विकू नका, व्यसन करू नका, वाईट मार्गाला लागू नका, असा संदेशही तरडे यांनी दिला. आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती धोरण समाजापुढे आणायचे आहे. यापूर्वी ते कोणीच सांगितले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य काळात राबवलेली “ऐन जिन्नस शेती कर्ज पद्धत” ही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते, असेही ते म्हणाले.

खासदार बारणे म्हणाले की, राजकारणामध्ये जे एरवी एकमेकांची तोंडे पाहत नाहीत, अशा विरोधकांनाही एकत्र आणण्याचे काम आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे काम दिशा फाउंडेशन करीत आहे. तरडे यांनी त्यांच्या चित्रपटांद्वारे वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आतापर्यंतच्या त्यांच्या सर्व कलाकृती यशस्वी ठरल्या आहेत. हंबीरराव देखील उत्तम चित्रपट असेल.

आमदार लांडगे म्हणाले की, तरडे यांच्या मुळशी पॅटर्न मधील “जमीन विकायची नसते, तर राखायची असते” या संदेशातून अनेकांना प्रेरणा मिळाली व त्यांनी जमीन विकण्याचा निर्णय बदलला. दिशा सोशल फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचे लांडगे यांनी कौतुक केले.

प्रास्ताविक नाना शिवले, सूत्रसंचालन अविनाश वाळुंज आणि संतोष निंबाळकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.