Pune : डिसेंबर २०१९ पर्यंत उरळी कचरा डेपो बंद

जमीन गेलेल्या वारसांना मिळणार २ महिन्यांत नोकरी 

ग्रामस्थांना मात्र घोषणांवर विश्वास नाही 

एमपीसी न्यूज – उरळी देवाची, फुरसुंगी येथील कचरा डेपो ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत बंद करण्यात येईल. कचरा डेपोसाठी जागा गेलेल्यांच्या वारसांना पालिकेत येत्या दोन महिन्यांत नोकरी दिली जाईल, असा निर्णय महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. 

देवाची उरळी, फुरसुंगी येथील कचरा डेपो, तसेच विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप, या दोन्ही गावांमधील ग्रामस्थ, या बैठकील उपस्थित होते. उरळीचा कचरा डेपो डिसेंबर २०१९ अखेर पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले.

या डेपोत दररोज १ हजार मेट्रीक टन कचरा येतो. त्यामधील ५०० मेट्रीक टन कचरा ३१ मार्चपर्यंत कमी केला जाणार आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील ५ गावांमध्ये प्रत्येकी १०० टनांचे प्रक्रिया प्रकल्प सुरू करून तिथे हा कचरा जिरवला जाईल. उर्वरित ५०० टन कचरा कमी करत डिसेंबर २०१९ अखेर डेपोत कचरा आणण्याचे काम थांबवले जाईल. याचे वेळापत्रकच आयुक्तांनी बैठकीत सादर केल्याचे शिवतारे यांनी सांगितले.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या केशवनगर, लोहगाव, सुखसागरनगर, खराडी, उरुळी देवाची या पाच गावामध्ये प्रत्येकी १०० टन असे एकूण ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले आहे.

तारखा आणि घोषणा करून आम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही, आम्ही हंजर सारखे प्रकल्प फसताना पाहिले आहेत. त्यामुळे जोपर्यंत महापालिकेची मानसिकता होत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही अशी भुमीका ग्रामस्थांच्या वतीने संजय हरपळे यांनी मंडळी आहे. तर   उरुळी देवाची याठिकाणी  १०० टनी कोणताही प्रकल्प होणार असल्याची कल्पना आम्हाला देण्यात आली नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

तर याउलट कचरा डेपोची जागाही पालिकेची आहे. राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत डिसेंबर २०१९ पर्यंत कचऱ्यावर प्रक्रिया करणारी पर्यायी यंत्रणा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. डेपोतील प्रकल्प सुरूच राहणार आहे. अशी भूमिका महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंडळी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.