Uran News: उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करा, खासदार बारणे यांची संरक्षणमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण-करंजा येथील सेफ्टी झोन रद्द करण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. त्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करुन उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

याबाबत खासदार बारणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन दिले.

त्यात म्हटले आहे की, केंद्र सरकारने 16 मे 1992 रोजी अध्यादेश काढून रायगड जिल्ह्यातील बोरी-पाखाडी, केगाव, म्हातवली या तीन गावातील महसुली हद्दीतील आणि उरण शहरातील सुमारे 271 हेक्टर क्षेत्रातील शेती, बिनशेती जमीन उरण-करंजा येथील नौदल शस्त्रासागर डेपोसाठी सेफ्टी झोन आरक्षण जाहीर केली.

या सेफ्टी झोन परिसरात सुमारे 40 हजाराच्या आसपास रहिवासी वास्तव्यास आहेत.

राज्य सरकारने 14 ऑगस्ट 2019, 15 जानेवारी 2021 रोजी सेफ्टी झोन रद्द करण्यासाठी संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मंजुरीसाठी हा विषय आपल्या खात्याकडे प्रलंबित आहे. त्यावर कारवाई करत उरण-करंजा सेफ्टी झोन रद्द करावा, अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.