Urmila Joins Shivsena : काँग्रेसमध्ये असताना आणि आताही कोणत्याही पदाची अपेक्षा नाही – उर्मिला मातोंडकर

एमपीसी न्यूज – काँग्रेस पक्ष सोडून मला 14 महिने झाले मात्र काँग्रेसमध्ये होते तेव्हाही मी पदाची अपेक्षा केली नव्हती. आज शिवसेनेत आल्यानंतरही मला पदाची अपेक्षा नाही. मला लोकांसाठी काम करायचं आहे म्हणून मी शिवसेनेत आले आहे, असे वक्तव्य उर्मिला मातोंडकर यांनी आज केले.

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन बांधले. यासह उर्मिला मातोंडकर यांनी नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

शिवसेना पक्षातील प्रवेशानंतर आज उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना प्रवेशासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेसाठी माझे नाव दिल्याचे मला कळत आहे. कंगनाने काही टीका केली तर तुम्ही उत्तर देणार का? त्यावर मी त्याबाबत काहीही प्रतिक्रिया देणार नाही असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं.

यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा दर्जा वाढावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे असं शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं. शिवसेनेच्या भक्कम अशा महिला आघाडीचा मी एक भाग झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. वर्षभरात या महाविकास आघाडीने खूप चांगलं काम केलं आहे. कोरोनाचं संकट असो, वादळ असो किंवा इतर आपत्ती असो मी या सरकारला कायमच चांगलं काम करताना पाहिलं आहे. कुठल्याही विशिष्ट धर्माच्या लोकांना या सरकारने विशेष वागणूक दिली नाही. सगळ्यांना समान वागणूक दिली ही बाब मला खूप महत्त्वाची वाटते.

“काँग्रेस पक्ष सोडताना मी राजकारण सोडेन असे म्हटलं नव्हतं. काँग्रेस सोडून मला 14 महिने झाले. त्यामुळे तो विषय आता जूना झाला आहे. कोणत्याही पदासाठी मी पक्ष बदलणारी व्यक्ती नाही. मला काम करण्याची संधी शिवसेनेत दिसली म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला”, असे उर्मिला यांनी सांगितलं.

सेक्युलर याचा अर्थ धर्माचा तिरस्कार करणे असा होत नाही. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. हिंदू धर्माचा मी अभ्यास केला आहे. त्यामुळे वेळ आल्यावर मी धर्मानुसारच वागेन, असेही वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

बॉलिवूडची प्रतिमा मलीन करण्याचा अत्यंत किळसवाणा प्रयत्न मधल्या काळात झाला, मी तेव्हाही कुणाच्या विरोधात बोलले नाही, आताही बोलत नाही. मी महाराष्ट्राच्या बाजूने बोलते आहे असंही उर्मिला यांनी स्पष्ट केलं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.