Urse : उर्सेतील सी.आय.इ.ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड कंपनीची सखोल चौकशी करण्यात यावी – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज-  मावळातील उर्से येथील ‘सी.आय. इ. ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड’ आयरन कास्टिंग डिव्हिजन या कंपनीची(Urse) सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव प्रदीप नाईक यांनी राज्य प्रदूषण महामंडळाकडे केली आहे. 

याप्रकरणी प्रदीप नाईक यांनी प्रदूषण मंडळाला एक अर्ज दिला असून या अर्जात त्यांनी म्हटले आहे की, कंपनीकडून वारंवार प्रदूषणाचे नियम हे धुडकावून लावले जात आहेत. यामुळे कंपनीद्वारे सतत हवा व नदी प्रदूषण केले जात आहे.

याबाबत गावकऱ्यांनी कंपनीच्या संबंधित अधिकारी यांना संपर्क साधून कंपनी विषयी तक्रार केली आहे. कंपनीतून बाहेर पडणारा धूर व धूळ यामुळे  परिसरातील ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. आसपासच्या शेतातील पिकांवर देखील धूळ साठल्याने पिकांचे व परिणामी शेताचे नुकसान होत आहे.तसेच कंपनीतून दूषित पाणी हे नदीपात्रात सोडल्यामुळे पाण्याचेही प्रदूषण होत आहे. याबाबत अनेक वेळा तोंडी तक्रार गावकऱ्यांनी कंपनीतील अधिकारी रवींद्र वैद्य मनोज मेनन, राजेंद्र वडलापुडी, संतोष कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत नागरिकांच्या तक्रारीला धुडकावून लावले(Urse) आहे.
प्रदूषणाबरोबरच कंपनीची अवजड वाहने ही गावालगत तसेच एक्सप्रेस हायवेच्या पुलावर उभा केलेली असतात. त्यामुळे गावकऱ्यांना व इतर नागरिकांना येण्या जाण्यासाठी सतत गैरसोय होते व यातून वाहतुकीचा मोठा प्रश्न उभा राहत आहे.
नदीत सोडलेल्या दूषित पाण्यामुळे हे गावकऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच नदीपात्रातील मासे देखील मरण पावत आहेत. कंपनीतील अधिकाऱ्यांना तक्रार देऊन देखील याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मंडळाने कंपनीचे व तेथील अधिकाऱ्यांचे सखोल चौकशी करावी व दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर रित्या कडक कारवाई करावी अशी मागणी प्रदीप नाईक यांनी त्यांच्या अर्जातून केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.