US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

US Corona Death Toll: 100,000 Corona victims in just 88 days in the US!

एमपीसी न्यूजजागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जगातील सर्वात जास्त हानी अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेत 29 फेब्रुवारीला कोरोनाचा पहिला बळी गेला. आणि त्यानंतर अवघ्या 88 दिवसांत अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा तब्बल एक लाखांच्या पुढे गेला आहे. 

जगातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोना बळींची संख्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 17 लाख13 हजार 654 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगातील कोरोनाबाधितांपैकी 30.47 टक्के कोरोनाबाधित हे एकट्या अमेरिकेत आहेत. त्यापैकी 4 लाख 68 हजार 778  इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी एक लाख 64 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत अजून 11 लाख 44 हजार 812 इतके सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा प्रसार व बळींची वाढती संख्या नियंत्रित करण्यात यश येत नसल्याने अमेरिका मेटाकुटीला आल्याचे पाहायला मिळत आहे.

अमेरिकेत कोरोनाचा पहिला बळी 29 फेब्रुवारीला गेला. 14 मार्चपर्यंत अमेरिकेतील कोरोना मृतांची संख्या 10 झाली होती. त्यानंतर मात्र अमेरिकेत कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळते. दररोज मृतांची संख्या वाढत गेली. 31 मार्चला एका दिवसांत एक हजारपेक्षा अधिक मृतांची नोंद झाली. त्या दिवशी 1085 जणांचा मृत्यू झाला होता. त्या संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला होता.

अमेरिकेत आतापर्यंत 52 दिवस मृतांचा आकडा एक हजारांच्या वर राहिला आहे. 52 पैकी 18 दिवस तर हा आकडा दोन हजारांपेक्षा अधिक होता तर 34 दिवस दररोज मृतांचा आकडा एक ते दोन हजारच्या दरम्यान होता. 21 एप्रिलला सर्वाधिक म्हणजे 2,683 बळींची नोंद झाली.

अमेरिकेतील किती तारखेला किती हजारांचा टप्पा ओलांडला?

  • 31 मार्च – एक हजार
  • 4 एप्रिल – 10 हजार
  • 12 एप्रिल- 25 हजार
  • 23 एप्रिल – 50 हजार
  • 7 मे – 75 हजार
  • 26 मे – एक लाख

अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोरोना महामारीचा सर्वात मोठा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 3 लाख 72 हजार 494 कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा 29 हजार 310 पर्यंत वाढला आहे. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यू जर्सीचा क्रमांक लागतो. न्यू जर्सीमध्ये एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 57 हजार 106 झाली असून बळींची संख्या 11 हजार 192 पर्यंत जाऊन धडकली आहे. मॅसेच्युसेट्स मृतांचा आकडा 6,416 तर मिशीगनमध्ये मृतांचा आकडा 5,240  तर पेनसिल्वानियामध्ये मृतांचा आकडा 5,184 इतका झाला आहे. ल्युसियाना, कॅलिफोर्निया, , फ्लोरिडा, इलिनोइस, वॉशिंग्टन, जॉर्जिया, टेक्सास आदी शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.