Pune : क्षमतांचा वापर केल्यास देशासाठी मोठे कार्य करू शकाल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा विद्यार्थ्यांना संदेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११६ वा पदवीप्रदान सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – “पदवी मिळाल्यानंतर पुढे काय? असा विचार न करता, विद्यार्थ्यांनी जीवनात लक्ष्य निर्धारित करावे. तुम्ही केवळ नोकरीमध्ये गुंतून न पडता आपल्यातील क्षमतांचा वापर केल्यास देशासाठी मोठे कार्य करू शकाल,” असा संदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११६ वा पदवीप्रदान समारंभ आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून हरियाणामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक प्रा. (डॉ.) गगनदीप कंग उपस्थित होत्या. कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर, उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य हेही या वेळी मंचावर उपस्थित होते.

देशात नोकऱ्या नाहीत असे मानणे चूक आहे. आपण जगातून अनेक गोष्टींची आयात करतो. याचाच अर्थ आपण देशातील श्रमशक्तीचा व्यवस्थित उपयोग करू शकलो नाही, असेही ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रगती करत असल्याबाबत श्री. कोश्यारी यांनी कुलगुरूंसह सर्वांचे कौतुक केले. त्याचबरोबर विद्यापीठाच्या या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांना जात असल्याचेही ते म्हणाले.

प्रा. (डॉ.) गगनदीप कंग यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बदलत्या भारतात यशस्वी होण्यासाठी त्रिसूत्री दिली. त्या म्हणाल्या की, शूर बना, उत्तरदायी बना आणि अकस्मिक योजना तयार ठेवा. समाज आपल्याकडून यशाची अपेक्षा करतो. यश मिळाले की सन्मान देतो, पण अपयशाची उपेक्षा करतो. आज तुम्ही यश मिळवले आहे, पण त्यामुळे नवी नाती, नवे ज्ञान, नवी उत्पादने, नवे दृष्टिकोन हे चमत्कार झाल्याप्रमाणे प्राप्त होणार नाहीत. त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे, नव्यातून शिकणे या गोष्टींची आवश्यकता आहे. तीच तुमच्या यशाची गुरूकिल्ली आहे. तुम्ही अपयशामुळे खचून गेलात तर संभाव्य संधींपासून वंचित राहाल. धैर्य आणि धोका पत्करणाऱ्या व्यक्तिंसाठी लोक जे.के. रोलिंग, स्टीव्ह जॉब्ज यांची उदाहरणे देतात, पण आपण क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पलीकडे पाहण्याची गरजही नाही. कारण त्यांनी झेललेले कष्ट आणि त्यांच्या कार्यातील सातत्य यामुळे त्या समाजात परिवर्तन घडवू शकल्या.

सध्या जीवन जगण्याचा कोणताही संपूर्ण सुरक्षित मार्ग उपलब्ध नाही. प्रत्येक मार्गात धोके आणि संकटे असतातच. भविष्यातील संकटे समजून घेऊन त्यातून मार्गही शोधायला हवा. या सर्वांच्या जोडीनेच आपण भविष्यासाठी तयार असायला हवे, त्यासाठी अकस्मिक योजनाही तयार ठेवायला हवी, असेही प्रा. कंग म्हणाल्या.

या वेळी कुलगुरू डॉ. करमळकर यांनी विद्यापीठातर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांचा आढावा सर्वांपुढे मांडला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयांमध्ये पीएचडी ते प्रमाणपत्र अशा एकूण १,०९,९३० (एक लाख नऊ हजार नऊशे तीस) पदव्यांचे वितरण करण्यात येत आहे. त्यात या पदव्यांमध्ये ११६ सुवर्णपदके आणि ३८९ पीएचडी पदव्यांचा समावेश आहे. सुवर्णपदके समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.

प्रमुख सुवर्णपदक विजेत्यांची नावे-

· दी प्रेसिडेंट ऑफ इंडिया शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक
(शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासेतर उपक्रम, सामाजिक कार्य, खेळ व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय सहभाग यासाठी)-
काजल पंडित महाजन (रामकृष्ण मोरे आर्ट्स, सायन्स व कॉमर्स कॉलेज, आकुर्डी, पुणे)

· निलिमा पवार सुवर्णपदक
(कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका अंतर्गत उत्कृष्ठ विद्यार्थिनी)
१. सुप्रिया सोमनाथ गोडसे
२. हर्षदा खंडू बारवकर

· माजी कुलपती पी.सी. अलेक्झांडर आंतरविद्यापीठिय मराठी वक्तृत्व स्पर्धेतील विजेते

प्रथम क्रमांक –
स्नेहल अमृतकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

दुसरा क्रमांक (विभागून)-
सारांश सोनार (कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाविद्यालय, जळगाव)
आणि
पूजा काटकर (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.