Vaccination News : शनिवारी राज्यात दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात 7 लाख 96 हजार 738 नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतीम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या 8 लाखावर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे.

राज्यात आतापर्यंत 6 कोटी 38 लाख 57 हजार 372 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. लसीकरणामध्ये राज्याने केलेल्या विक्रमी कामगिरीची नोंद घेत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

गेल्या तीन महिन्यात लसीकरण मोहिमेमध्ये देशात महाराष्ट्राची कामगिरी विक्रमी राहिली आहे. प्रत्येक दिवशी आधीच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. रात्री उशिरापर्यंतची आकडेवारी येईपर्यंत दिवसभरात 8 लाख नागरिकांच्या लसीकरणाची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविली जाईल, असे डॉ.व्यास यांनी सांगितले. यापूर्वी 26 जून रोजी 7 लाख 38 हजार 704 नागरिकांचे एकाच दिवशी लसीकरण करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.