Vaccination News : देशातील लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण, 156.76 कोटी नागरिकांचे लसीकरण

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज (रविवार, दि.16) एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्षानंतर देशात 156.76 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे . देशात 15 वर्षापुढील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. तसेच, दोन्ही डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस देखील दिले जात आहेत.

केंद्रिय आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशात 365 दिवसानंतर 156 कोटी 63 लाख 10 हजार 110 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी 90 कोटी 68 लाख 44 हजार 414 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, 65 कोटी 51 लाख 95 हजार 703 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच 42 लाख 69 हजार 993 जणांनी लसीचे बूस्टर डोस दिले आहेत.

भारतामध्ये प्रामुख्याने भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोवॅक्सिन’ आणि ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वार बनवलेली ऑक्सफर्ड एस्ट्राजिनाची ‘कोव्हीशील्ड’ या दोन लसी दिल्या जात आहेत. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आपात्कालीन परिस्थितीमध्ये मॉडर्ना, जॉन्सन-जॉन्सन तसेच Zydus Cadila या तीन लसींच्या वापराला परवानगी दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अभिवादन केले आहे. लसीकरण मोहिमेत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनी बजावलेल्या भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. भारताच्या लसीकरण कार्यक्रमामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.