Vaccination Registration : कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्यांना मिळणार चार अंकी सिक्युरिटी कोड

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी नोंदणी करणाऱ्यांना आता नवा चार आकडी सिक्युरिटी कोड मिळेल. कोविन पोर्टल, कोविन ॲप अथवा आरोग्यसेतू ॲप यांच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना हा नवा चार आकडी सिक्युरिटी कोड मिळणार आहे. शनिवार (दि.08) पासून हा बदल अंमलात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशातील काही नागरिकांनी कोविन पोर्टलच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी दिवस आणि वेळ निश्चित केली होती. मात्र, ठरलेल्या दिवशी ते प्रत्यक्ष लस घेण्यासाठी गेलेच नाहीत, तरीही त्यांनी ठरलेल्या दिवशी लस घेतली आहे असा लघुसंदेश त्यांच्या मोबाईलवर आल्याचे निदर्शनास आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबतच्या परीक्षणाअंती असे दिसून आले की संबंधित नागरिकांनी लस घेतली आहे अशी चुकीची माहिती संगणक प्रणालीत नोंदली होती, म्हणजेच यात लसीकरण करणाऱ्या संस्थेच्या माहिती भरण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या.

अशा त्रुटी कमी करण्यासाठी आणि त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी, कोविन प्रणालीमध्ये ‘चार अंकी सुरक्षा कोड’ असलेल्या नव्या वैशिष्ट्याचा समावेश करण्यात आला आहे. पहिला तसेच दुसरा डोस घेण्यासाठी कोणत्या केंद्रावर कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेच्या स्लॉटमध्ये जायचे हे लक्षात येईल. नागरिकांचा गोंधळ टळेल. सिक्युरिटी कोड नोंदणी करणाऱ्याने दिलेल्या मोबाइल नंबरवर मेसेजच्या स्वरुपात येईल.लसीकरणाच्यावेळी हा कोड दाखवणे बंधनकारक आहे.

लसीकरण केंद्रावर सिक्युरिटी कोडची नोंद केली जाईल. यामुळे लसीकरणाच्या डेटाबेसमधील दोष दूर करण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. लसीकरण प्रक्रियेतील पारदर्शकता राखणे शक्य होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.