Vadgao : ईदची नमाज यंदा ईदगाह व मशिदीऐवजी घराघरात अदा करा : आफताब सय्यद

एमपीसीन्यूज – गेल्या 1400 वर्षामध्ये असं कधीच झालं नाही की मुस्लिम बांधवानी रमजान ईदची नमाज ना ईदगाहवर ना मस्जिदमध्ये अदा केली. पण येत्या 25 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या ईद निमित्त प्रथमच ईदगाह व मस्जिदमध्ये न जाता घराघरातच ते नमाज अदा करणार आहेत. मावळ तालुक्यातील लोनावळा, कामशेत तळेगाव, देहूरोड व वडगाव या प्रमुख शहरातील मुस्लिम बांधवांनी देखील हा निर्णय घेतला आहे.

वडगाव मावळ येथील दोन दिवसापूर्वी वडगाव मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ईद-उल-फित्रची नमाज आपण आपल्या घरीच पठण करुन येणारी रमजान ईद समाजातील गरीब गरजु लोकांना मदत करुन साजरी करण्याचे आवाहन मावळ तालुका अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आफताब सय्यद यांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले आहे.

या बैठकीस ट्रस्टचे पदाधिकारी रशिद शेख, सलीम तांबोळी, मौलना मुजिब, जावेद तांबोळी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता, फिजिकल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी या वर्षात येणा-या धार्मिक प्रार्थना सर्वांनी आप आपल्या घरातच करणे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे.

जेणे करुन कोरोनाविरुद्धचा लढा हा मानवता, विज्ञानवादाच्या दृष्टिकोनातून तुम्हा आम्हाला जिंकता येईल.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी संयम दाखवून, शासनाच्या नियमांच्या आधीन राहून, आम्ही संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करतो, हे कृतीतून दाखवून द्यावे.

संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करणाऱ्या भारतात आज शांतता, सदभाव अधिक दृढ करण्याची आवश्यकता असून कोरोना प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी होण्यासाठी आपण आपल्या पध्दतीने प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहनही सय्यद यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.