Vadgaon : मावळात आज 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण : एका मृत्यूची नोंद

59 corona positive patients in Maval today: one death recorded : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आज, मंगळवारी तालुक्याच्या विविध भागात मिळून एकूण 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागातील 11, तर ग्रामीण भागातील 48 रुग्णांचा समावेश आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये शहरी भागातील तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत 5, वडगाव नगर पंचायत आणि लोणावळा नगरपरिषद हद्दीत प्रत्येकी 3, अशा 11 रुग्णांचा समावेश आहे.

तर ग्रामीण भागामध्ये सुदुंबरे येथील एनडीआरएफ कॅम्पमधील सर्वाधिक 33, सदुंबरे गावात 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

तसेच कामशेत, ऊर्से, इंदुरी, वराळे, कुसगाव, जांभूळ आणि नाणोली या गावांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. या शिवाय तुंगार्ली येथे 2 आणि सोमाटणे येथे 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

दरम्यान, आज वराळे येथील 52 वर्षीय शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी सर्दी, थंडी, खोकला आणि तापाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचा स्वाब घेण्यात आला होता.

त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आज उपचार सुरु असताना पिंपरी चिंचवड येथील वायसीएमएच रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

आजपर्यंत मावळ तालुक्यात एकूण 424 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 158 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 11 जणांचा मृत्यू झाला.

सध्या तालुक्यात 255 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 145 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून, 110 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असल्याची महिती तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.