Vadgaon Crime News : वकिलाकडून लाच स्वीकारताना दुय्यम निबंधक ‘एसीबी’च्या जाळ्यात

एमपीसीन्यूज : नोंदणी झालेल्या दस्तावर शिक्का मारून, सही करून देण्यासाठी प्रत्येकी 500 प्रमाणे पंधरा दस्तांसाठी एका वकिलाकडून 7500 रुपयांची लाच स्वीकारताना दुय्यम निबंधकाला लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. आज, मंगळवारी वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

जितेंद्र दयाराम बडगुजर (वय -50), असे कारवाई करण्यात आलेल्या दुय्यम निबंधकाचे नाव आहे. याबाबत 52 वर्षीय वकिलाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

फिर्यादी वकील दस्त नोंदणीचे काम करतात. त्यांच्या अशिलांच्या नोंदणी झालेल्या दस्तावर शिक्का मारून, सही करून देण्यासाठी प्रत्येकी आरोपी दुय्यम निबंधकाने त्यांच्याकडे 500 प्रमाणे पंधरा दस्तांसाठी 7500 रुपये लाचेची मागणी केली.

त्यामुळे फिर्यादी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी फिर्यादीकडून 7500 रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी रंगेहाथ पकडला गेला. याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक वर्षाराणी पाटील, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, कॉन्स्टेबल अंकुश आंबेकर,अभिजीत राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.