Vadgaon : मावळ तालुक्यात बी – बियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

एमपीसीन्यूज : मान्सून पूर्व वळवाच्या पावसाची सुरुवात होताच मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून खरीप पिकाचे बी – बियाणे आणि खते खरेदीसाठी विशेष सेवा केंद्रामध्ये मोठी गर्दी होत आहे. या वर्षी इंद्रायणी भाताचे बी – बियाणे खरेदीकडे स्थानिक शेतक-यांचा मोठा कल असल्याचे दिसून येते.

देशात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सून बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून खरीप पिकांच्या पूर्व तयारीसाठी धावपळ होत आहे. शेतीची मशागत, रोप तयार करणे, सेंद्रिय खते आणून ठेवणे व टाकणे आदि कामात शेतकरी वर्ग व्यस्त आहे.

_MPC_DIR_MPU_II

मावळ तालुका अति पावसासाठी प्रसिध्द असल्याने या तालुक्यात भातपिक सर्वात जास्त घेतले जाते. तालुक्यात १५ हजार ४४७ हेक्टर खरीप शेतीपैकी सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावर फक्त भात पिक घेतले जाते. खरीप पिकांपैकी इंद्रायणी भात जातीचे पिक ७० ते ८० टक्के घेण्यात येते.

मावळ तालुक्यात मान्सून पूर्व पावसाची सुरुवात झाली असून शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी नजीकच्या बियाणे केंद्रावर गर्दी होत आहे. इंद्रायणी भात जातीचे बियाणे खरेदी करण्याकडे त्यांचा जास्त कल आहे, असे तळेगाव व कामशेत कृषी सेवा केंद्राचे प्रमुख नितीन जगताप यांनी सांगितले. इंदोरी येथील कृषी सेवा केंद्राचे प्रमुख गणेश दाभाडे यांच्या सेवा केंद्रातही शेतकरी बी- बियाणे खरेदीसाठी येत आहेत.

मावळ तालुक्याच्या विविध भागातील कृषी सेवा केंद्रावर भात बियाण्यांबरोबर रोजरोज त्यासाठी लागणारी खते खरेदी करण्यासाठी शेतकरी येत असल्याचे पवनानगर, इंदोरी, कडधे, परंदवडी, तळेगाव येथील कृषीसेवा केंद्र प्रमुखांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1