Vadgaon : मावळ तालुक्यात सोमवारपर्यंत सहा ठिकाणी अन्नछत्रालय सुरू करणार : आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात सोमवारपर्यंत सहा वेगवेगळ्या ठिकाणी अन्नछत्रालय सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून मोफत दोन वेळचे जेवण गरजूंना घरपोच देण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे, आंबी, वडगाव, लोणावळा, टाकवे, उर्से या ठिकाणी अन्नछत्रालय उभी राहणार आहेत, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.

ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, असे अनेक मोलमजुरी करणारे कामगार लॉकडाऊनमुळे मावळ तालुक्यामध्ये अडकले आहेत. त्यांना दोन वेळचे अन्न त्यांच्या वस्तीपर्यंत घरपोच देण्याची व्यवस्था ह्या अन्नछत्रालयांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही अन्नछत्रालयाची योजना सुरू करीत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सूचना करून आपत्कालीन निधी म्हणून या अन्नछत्रालयासाठी वापरण्यात यावा, अशा सूचना दिलेल्या आहेत, अशी माहितीही आमदार शेळके यांनी दिली.

गरजू नागरिकांची संख्या मोठी असल्याने अन्नछत्रालयाची व्यवस्था करण्यात येत असली तरी आजपर्यंत ज्यांनी कुणावरही उपासमारीची वेळ येऊ दिली नाही. अशा विविध दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी अन्नदानाचे उपक्रम लॉकडाऊन असेपर्यंत बंद करू नयेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

तालुक्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक जबाबदारी जपत कुणाला धान्य, जीवनावश्यक वस्तू स्वरुपात मदत करावयाची असल्यास ती स्वीकारली जाईल, राज्य शासनाचा आपत्कालीन निधी व लोकसहभागातून ही अन्नछत्रालय लॉकडाऊन संपेपर्यंत चालू राहतील, असेही आमदार शेळके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.