vadgaon : शहरात सम, विषम पार्किंगचा फज्जा; नगरपंचायतीच्या मनमानी कारभाराचा परिणाम

Fuzz of even, odd parking in the city; Consequences of arbitrary management of Nagar Panchayat : व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्ये नाराजी

एमपीसीन्यूज ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी आढळलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण म्हणून स्थानिक प्रशासन हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करत त्यांनी ठरवून दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी करतांना दिसून येते. मात्र, याला अपवाद ठरलेली वडगांव नगरपंचायत आपल्या मनाला येईल ते निर्णय घेण्यात अग्रेसर झाल्याचे दिसत आहे. दक्षिण उत्तर अशी एकमेव बाजारपेठ असलेल्या वडगांव शहरात नुकताच P- 1 आणि P-2 अशा सम आणि विषम तारखेला दुकाने उघडावीत, असा आदेश वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, या आदेशाचा फज्जा उडाल्याचे चित्र वडगावात पाहायला मिळत आहे.

वास्तविक पाहता हा आदेश लागू करण्यापूर्वी स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे तसेच लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. त्याचबरोबर स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता एकतर्फी हा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते.

राज्य शासनाने ठरवून दिलेल्या सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेचे पालन तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले. मात्र, तरीही याबाबत सकारात्मक निर्णय झाला नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी बाजारपेठ फिरून पाहिली असती तर या बाजारपेठेत एक दुकान बंद असल्यास दुसऱ्या दुकानात गर्दी वाढते आणि त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडत असल्याचे पाहायला मिळाले असते. वडगांवला इतरत्र जरी दुकाने असली तरी मुख्य बाजारपेठ ही एकच आहे .

ग्राहक गरजेच्या वस्तू घेण्यासाठी बाजारात आले आणि P 1 – P 2 च्या नियमाचा त्याला फटका बसला किंवा संबंधित दुकान जर बंद असले तर त्याला विनाकारण हेलपाटा बसतो. तसेच गर्दी वाढते, त्यामुळे दुकानदारावर गर्दीचा ताण येतो, याबाबत देखील नगरपंचायत अनभिज्ञ आहे असे दिसते.

नगरपंचायत – प्रशासन – व्यापारी- ग्रामस्थ यांचा योग्य तो समतोल राखला गेला पाहिजे याची देखील सर्वांनी दखल घेणे गरजेचे आहे.

विनाकारण लादलेली P 1 – P 2 ची पद्धत तातडीने रद्द करून राज्य शासनाने दिलेल्या सकाळी 9 ते 7 यावेळेत दुकाने उघडावीत किवां पिंपरी चिंचवड सारखे 5 दिवस लॉकडाऊन करावे, असे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचा सोशल मीडियावर निषेध

भाजप गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण, शहर अध्यक्ष किरण भिलारे, महिला शहर अध्यक्षा धनश्री भोंडवे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष भुषण मुथा, प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, प्रसाद पिंगळे, विकी म्हाळसकर आदींसह भाजपचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या निर्णयाचा सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला आहे.

या संदर्भात लवकरच वरिष्ठ पातळीवर प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे मावळ भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.