Vadgaon : मावळ तालुक्यामध्ये सहा जणांची कोरोनावर मात

In Maval taluka, six people defeated corona

एमपीसीन्यूज – मावळात मागील 23 दिवसात आढळलेल्या सोळा रूग्णांपैकी सहा जणांनी कोरोनावर मात  केली.  तर  सलग तीन दिवसांत एकाही  रूग्णाची वाढ झाली नसल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व  तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली आहे. 

दरम्यान, आज, सोमवारी नागाथली येथील  42 व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील बहुतांशी व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता कोणताही तपासणी अहवाल बाकी नसल्याचे त्यांनी सांगितले.

शहरी भागात सहा तर ग्रामीण भागात दहा असे 23 दिवसात 16 रूग्ण कोरोनाबाधित झाले असून, यापैकी 14 रूग्ण हे दि. 19 मे  ते दि. 29 मे या दहा दिवसात सापडले आहेत.

बाधित झालेल्या 16 रुग्णांपैकी तळेगाव व माळवाडी येथील दोन महिला यापूर्वी व काल 31 मे रोजी अहिरवडे, चांदखेड व घोणशेत येथील तीन रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईहून नागाथली येथे आलेली 42 वर्षीय व्यक्तीला आज (दि 1 जून)  बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सक्रिय   रूग्णांची संख्या 10 आहे.

दि 27, 28, 29 मे  या तिन दिवसात रूग्णांच्या संख्येत वाढ होत होती, त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांत एकाही रूग्णाची वाढ नाही. उलटपक्षी काल तीन रूग्णांनी तर आज एका रूग्णानी कोरोनावर मात करून डिस्चार्ज घेतला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, हे फार दिलासादायक बातमी आहे.

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने या नियमांचे काटेकोर पालन केल्यास मावळ तालुक्यातून कोरोना लवकर हद्दपार होईल, असे डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

… तर मावळ तालुका लवकरच कोरोना मुक्तीच्या! उंबरठ्यावर !

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे,  तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे, गटविकासाधिकारी शरदचंद्र माळी, लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अविरत परिश्रम घेतले आहेत.

तसेच कोरोनाबाधित रूग्णांची स्थिती सुधारण्याच्या मार्गावर असून यापुढे तालुक्यात पाॅझिटिव्ह रूग्ण आढळला नाही, तर मावळ तालुका लवकरच पुन्हा कोरोना मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.