Vadgaon Maval : दोन मोबाईल चोरांना अटक

एमपीसी न्यूज – स्थानिक गुन्हे शाखेने दोन मोबाईल चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेले सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले. यामुळे वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दत्ता शिवाजी तुमकर (रा. वऱ्हाळे, ता.मावळ), आकाश संजय कोरे (वय 17, रा. सदगुरुनगर शिवसंभो कॉलनी, भोसरी) अशी अटक केलेल्या मोबाईल चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कान्हेफाटा येथे एका घराचा कडी कोयंडा लोखंडी सळईने उचकटून घरात प्रवेश करून चोरी झाली. यामध्ये घरातील मोबाईल फोन चोरून नेला होता. त्याबाबत तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दत्ता याला तळेगाव दाभाडे मधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यात मोबाईल फोन चोरल्याचे सांगितले. दत्ता कडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.

आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने आकाश याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे शिताफीने चौकशी केली असता त्याने सहा मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली. यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांकडून एकूण सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. यामुळे वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.