Vadgaon Maval : प्रसाद जाधव याच्यावरील उपचारासाठी 27 हजार रुपयांची आर्थिक मदत

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील खाउगल्लीमध्ये पावभाजीचा व्यवसाय करणारा तरुण प्रसाद सोन्या जाधव (वय 28) हा विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झाला. त्याच्यावरील उपचारासाठी वडगांव मावळ येथील ऐश्वर्यलक्ष्मी पतसंस्था , मोरया महिला बचत गट , वडगांव शहर भाजपा महिला आघाडी आणि बालविकास मित्र मंडळ यांचे वतीने 27 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

प्रसाद सोन्या जाधव याचे नुकतेच लग्न झाले आहे. शुक्रवारी (दि. 31 मे ) विवाहनिमित्त घरामध्ये आयोजित केलेल्या पूजेच्या वेळी प्रसाद हा विजेच्या खांबावर अडकलेला बॅनर काढण्यासाठी खांबावर चढला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये तो 40 फूट उंचीवरून खाली डांबरी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत तो 60 टक्क्यापेक्षा अधिक भाजला असून त्याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याच्यावरील उपचाराचा खर्च या कुटुंबाला पेलवणार नाही. त्यामुळे तळेगावकर नागरिकांनी प्रसादवरील उपचारासाठी शक्य तेवढी आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत वडगांव मावळ येथील ऐश्वर्यलक्ष्मी पतसंस्था, मोरया महिला बचत गट , वडगांव शहर भाजपा महिला आघाडी आणि बालविकास मित्र मंडळ यांचे वतीने २७ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

सुप्रिया चव्हाण, पद्मावती ढोरे, विशाखा कुलकर्णी, अबोली ढोरे, वैशाली म्हाळसकर, वडगांव शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे, करुणा पवार, सीमा भिलारे, राजेश ढोरे, अतुल राऊत, अभिजित पाटील, भूषण मुथा आदींच्या उपस्थितीत ही रक्कम जाधव यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.