Vadgaon Maval : ‘लोकल’खाली सापडून मूकबधिर महिलेचा मृत्यू; तर, सुदैवाने 4 वर्षाचा मुलागा बचावला

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर ‘लोकल’खाली सापडून मूकबधिर महिलेचा जागीच मृत्यू झाला तर, सुदैवाने 4 वर्षाच्या मुलाचा जीव वाचला. ही घटना मंगळवार (दि.11) दुपारी 12.57 वाजता कान्हे (ता.मावळ) रेल्वे स्टेशनजवळ घडली.

रेखा प्रकाश शेलार (वय 26 रा. बोरवली आंदर मावळ ता. मावळ) रेल्वे खालीसापडून मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.विराज प्रकाश शेलार वय 4 वर्ष या बालकाचा सुदैवाने जीव वाचला.

याबाबत लोहमार्ग सहाय्यक पोलीस फौजदार एल. जी. पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा शेलार आणि तिचा आजारी मुलगा विराज याला घेऊन बोरवली येथून कान्हे येथे खासगी दवाखान्यात निघाली होती. कान्हे रेल्वे स्टेशनजवळ पुणे-लोणावळा रेल्वे ‘लोकल’खाली सापडून मूकबधिर महिला रेखा शेलार गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. यात तिचा 4 वर्षाचा मुलगा विराज सुदैवाने वाचला आहे.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस फौजदार एल. जी. पठाण आणि महिला कर्मचारी सिंधू मोहिते यांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयत महिला रेखा शेलार हिचा पतीही मूकबधिर आहे. घराची परिस्थिती खूपच हलाखीची आहे.

आजारी मुलाला वैद्यकीय उपचार देण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जात असताना हा अपघात झाला. यात आईचा मृत्यू तर, मुलगा वाचल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.