Vadgaon Maval : बधलवाडी येथे कृषी शेतीशाळेस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- आधुनिक कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जावे, या उद्देशाने कृषी विभागामार्फत सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया पाटील यांनी बधलवाडी (नवलाखउंब्रे) येथे शेतीशाळेचे आयोजन केले होते. या शेतीशाळेला स्थानिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी संपूर्ण रब्बी हंगामात 10 शेतीशाळा वर्ग घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सोमवार (दि.10) रोजी घेण्यात आलेल्या या शेतीशाळेमध्ये कामगंध सापळयांचा वापर, पक्षी थांबे,कीड व रोगाचे नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5 टक्के निंबोळी अर्क त्यानंतर गरज पडल्यास इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच जैविक नियंत्रणामध्ये एचएनपीव्ही म्हणजेच हेलिओकील या जैविक कीडनाशकाची 10मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अशी शेतीसाठी उपयुक्त माहिती यावेळी देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

मावळात रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना विविध पिकांच्या लागवड, व्यवस्थापन, काढणी, काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यासाठी शेतकरी शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच माती परीक्षण, पिकांची निवड, लागवड पद्धती, लागवडीनंतर कीड, रोग, खत, पाणी व्यवस्थापन, एकात्मिक पिक, किड व रोग व्यवस्थापन, काढणी तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञान या बाबतचे प्रशिक्षण या शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. या वर्षी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने लागवड करण्यावर भर देण्यात आले असुन याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असे सहाय्यक कृषी अधिकारी पाटील यांनी सांगितले.

ही शेतीशाळा तालुका कृषी अधिकारी देंवेद्र ढगे, मंडळ कृषी अधिकारी कुलकर्णी, कृषी पर्यवेक्षक तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी कृषीमित्र अनिल बधाले, नितीन बधाले, गबाजी दहातोंडे, दशरथ बधाले, राजु बंधारे, ज्ञानेश्वर दहातोंडे, कोंडिबा दहातोंडे आदीं सह शेतकरी महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1