Vadgaon Maval : सोळावं वर्ष धोक्याचं नसून मोक्याचं आहे- हभप जयश्रीताई येवले

बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिराचा समारोप

एमपीसी न्यूज- जगात नाम मोठे आहे व श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल नाम मुखाने घ्याल तर सुखी व्हाल. बाकीची धनसंपती मातीमोल आहे. गळयात पवित्र तुळसी माळ घाला व एकादशी व्रत करा. हरीचे दास व्हा. असा संदेश मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित निवासी बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिरामध्ये देण्यात आला. या शिबिरामध्ये 55 बाल वारकरी सहभागी झाले होते.

श्री साईबाबा सेवाधाम कान्हे, ता मावळ येथे दि 12 ते रविवार दि 19 मे दरम्यान हे शिबिर पार पडले. या संस्कार शिबिराची रविवारी (दि. १९) सांगता झाली. या संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी माजी आमदार दिगंबर भेगडे, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, देवराई संस्थेचे, सुकनशेठ बाफना, पुणे जिल्हा भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, मावळ भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळसकर, मावळ प्रबोधिनीचे रवींद्र अप्पा भेगडे, पवन मावळ दिंडी समाजाचे अध्यक्ष रघुनाथराव लोहोर, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, रोहिदास महाराज धनवे, सुखदेवमहाराज ठाकर, दत्तात्रय शिंदे, बाबाजी महाराज काटकर, संतोष कुंभार, महादुबुवा नवघणे, सभापती सुवर्णा कुंभार, जयश्रीताई येवले, यदूनाथ चोरघे, नामदेव भसे, संतोष पापळ, नाथा भसे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी अशा संस्कार शिबिराची गरज असल्याचे प्रतिपादित केले. ते म्हणाले, ” ही एक चांगल्या परिवर्तनाची नांदी असून या शिबिरामुळे भविष्यात चांगली पिढी तयार होईल, वारकरी संप्रदाय हा पवित्र आहे. त्याने राजकारणापासून अलिप्त रहावे” अशी सूचना त्यांनी केली.

या शिबिरात हरिपाठ पाठांतर, श्रीमद्भगवदगीता संहिता, संत चरित्र, हनुमान चालिसा, शारीरिक व्यायाम, संस्कृत संभाषण वर्ग, सांस्कृतिक कार्यक्रम, शास्त्रोक्त पद्धतीने मृदंग वादन, गायन व वारकरी सांप्रदायिक इत्यादी प्रकारचे शिक्षण देण्यात आले.

या संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी हभप जयश्रीताई येवले यांनी संस्कार शिबिराचे महत्व अधोरेखित करताना संत तुकाराम महाराजांच्या

आम्ही तेणे सुखी l म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ll
तुमचे येर वित्त धन l ते मज मृत्तिकेसमान ll
कंठी मिरवा तुळसी l व्रत करा एकादशी ll
म्हणवा हरिचे दास l तुका म्हणे मज हे आस ll

या अभंगावर निरूपण केले. त्या म्हणाल्या, ” सोळावं वर्ष धोक्याचं नसून मोक्याचं आहे. संत ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, सोळाव्या वर्षीच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. जगात नाम मोठे आहे व श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल नाम मुखाने घ्याल तर सुखी व्हाल. बाकीची धनसंपती मातीमोल आहे. गळयात पवित्र तुळसी माळ घाला व एकादशी व्रत करा. हरीचे दास व्हा ” असा संदेश त्यांनी दिला. विद्यार्थी व पालकांनि मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या संस्कार शिबिराचे सात दिवस उत्तम नियोजन हभप दीपक वारींगे, नानासाहेब घोजगे, शांताराम गायखे, बळवंत येवले, बाळासाहेब वारींगे, सुभाष देशमुख, हनुमंत थोरवे, सदाशिव पेठकर, बंडू कदम, सतिश सावंत, नवनाथ जांभळे, किसन मावकर, भिमाजी गायखे, प्रभाकर टेमगिरे, गुलाब घारे, सुखदेव गवारी आदींनी चोख ठेवले.

या सप्ताह कालावधीत हभप दत्तात्रय हजारे, भागवत महाराज उगले, नितीन आडीवळे सर, ज्ञानेश्वर जगताप सर, सुभाष भानुसघरे सर आदी शिक्षकवृंदानी परिश्रम घेऊन बाल वारक-यांना मार्गदर्शन केले.

मावळ प्रबोधिनीचे रवींद्र भेगडे व हभप पंढरीनाथ बळवंत शेटे यांचे विशेष सहकार्याने अन्नप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. हभप दिलीप वावरे यांचे कडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तर देवराई संस्थेचे संस्थापक सुकनशेठ बाफना यांचेकडून बाल वारकरी मंडळींना मोफत गणवेश देण्यात आले. निवासी शिबिरामध्ये देहू- भंडारा डोंगर सहलीसाठी प्रताप गुंजाळ यांचे कडून मोफत बससेवा देण्यात आली.

राधा कल्याणदास दर्यानाणी चॅरिटेबल ट्रस्ट साईबाबा सेवाधाम कान्हे चे व्यवस्थापक दत्तात्रय चांदगुडे यांच्या वतीने बाल वारक-यांची मोफत व्यवस्था करण्यात आली. अनेक दानशुर व्यक्तींनी या कामी सढळ हाताने मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप दिलीप वावरे यांनी केले. प्रास्ताविक सचिव रामदास पडवळ यांनी केले तर आभार अध्यक्ष नंदकुमार भसे महाराज यांनी मानले. संस्कार शिबिर यशस्वीतेसाठी नंदकुमार भसे आणि त्यांच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.