Vadgaon Maval: वडगाव सर्कल अपघाताचा सापळा, आयआरबीविरोधात आंदोलनाचा भाजपचा इशारा

आयआरबीकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टोल वसूल केला जात असून रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.

एमपीसी न्यूज- पुणे महामार्गावरील वडगाव सर्कल अपघाती मृत्यूचा सापळा बनला आहे. आयआरबीने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे आठ दिवसांत उपाययोजना न केल्यास भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मावळ भाजपचे प्रसिद्धी प्रमुख व श्री पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे यांनी दिला आहे.

वडगाव शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देहूरोड ते लोणावळा दरम्यान जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वडगाव सर्कलवर महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्या मोठ्या प्रमाणावर खचल्या असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वास्तविक पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून साईड पट्ट्या करणे आवश्यक असताना आयआरबीने कोणतीच उपाययोजना केलेली नाही.

पुण्याकडून आलेल्या वाहनांना तळेगाव एमआयडीसीकडे जाण्यासाठी याच वडगाव सर्कलवरून वळण घ्यावे लागते. परंतु, या ठिकाणी साईड पट्ट्या नसल्याने वळणरस्ता अपुरा पडतो व त्यामुळे अपघात घडतात.

दैनंदिन अवजड वाहने साईट पट्ट्यावर गेल्याने फसत असून अनेकवेळा वाहने उलटून अपघात झाले आहेत. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा साईट पट्ट्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी वडगाव भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

या महामार्गावरून २४ तास औद्योगिक क्षेत्रातील व इतर वाहतूक सुरू असते. आयआरबीकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टोल वसूल केला जात असून रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.

बोऱ्हाडे वस्ती (साते) हद्दीत दुभाजक तुटले असून धोकादायक झाले आहेत. साईट पट्ट्या खचल्याने महामार्गात चिखल येत असून महामार्ग निसरडा होत आहे. अनेक ठिकाणी महामार्गावरील नाल्यांची सफाई केली नाही.

महामार्गाच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचले असून महामार्गाची सफाई केली जात नाही. महामार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण केले जात नाही. केवळ टोल वसुली केली जात असुन दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

साईट पट्ट्या खचल्याने या महामार्गावर वाहने उलटून किरकोळ व गंभीर अपघात होत आहेत. आयआरबीकडून आठ दिवसांत साईट पट्ट्या व इतर दुरुस्ती कामे झाली नाही तर वडगाव भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी राजपुरी येथील एका अभियंत्याचा याच ठिकाणी नाहक बळी गेला आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष किरण भिलारे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रमेश ढोरे, भाजपचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या निर्णयाचा व्हाट्सअप व फेसबुक द्वारे निषेध व्यक्त केला असून लवकरच वरिष्ठ पातळीवर प्रशासनाला या संदर्भात निवेदन देणार आहे, असे अनंता कुडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.