Vadgaon Maval : सामुदायिक विवाह सोहळ्यात 201 विवाह करण्याचा मावळ प्रबोधिनीचा संकल्प

मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांचा संकल्प मेळावा

एमपीसी न्यूज- मावळ तालुका सामुदायिक विवाह सोहळा समिती व मावळ प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा 201 सामुदायिक विवाह करण्याचा संकल्प केला आहे.  तळेगाव दाभाडे येथे झालेल्या संकल्प मेळाव्यात मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांनी ही घोषणा केली. मावळ तालुका वारकरी सांप्रदायाच्या मार्गदर्शनाखाली विवाह सोहळा समिती काम करणार आहे.

कान्हे फाटा येथील तनिष्का मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या संकल्प मेळाव्याला माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, हभप रघुनाथ लोहोर, शंकर दादा शेलार, मावळचे सभापती गुलाब म्हाळसकर, माजी सभापती निवृत्ती शेटे, महादू सातकर, सोपानराव म्हाळसकर, रोहिदास महाराज धनवे, नितीन महाराज काकडे, रवींद्र अप्पा भेगडे,रघुवीर शेलार, नंदकुमार भसे आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.

या संकल्प मेळाव्यात अध्यक्ष ह.भ.प श्री. रोहिदास महाराज धनवे यांनी आपली कार्यकारणी जाहीर केली. तसेच मावळ प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी व मावळ प्रबोधिनी युवा अध्यक्ष रवी शेटे यांनी आपली कार्यकारणी जाहीर केली. विशेष म्हणजे या सोहळा समितीचे सल्लागार म्हणून माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, माऊली दाभाडे, पै. चंद्रकात सातकर, ज्ञानेश्वर दळवी, माऊली शिंदे हे सर्व सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.

या सोहळ्यामध्ये नावनोंदणीसाठी फक्त अकरा रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. सुमारे 201 जोडपी या सोहळ्यात आपला सहभाग नोंदवतील असा संकल्प सर्व उपस्थितांनी केला. संकल्प मेळाव्याच्या दिवशीच 14 जोडप्यांनी आपली नावे नोंदवून या संकल्पाचा शुभारंभ केला. संस्थेच्या वतीने वधु-वरास साखरपुडा, हळदी व लग्न असे तीन पोशाख देण्यात येणार आहेत. त्याशिवाय संसारोपयोगी भांडी, गॅस कनेक्शन व भाग्यवान जोडप्यास देशी वंशाची गाय देण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना माजी आमदार कृष्णराव भेगडे म्हणाले, ” विवाह सोहळ्यात नवरी मुलीला नातेवाईक मंडळी संसार उपयोगी साहित्य रूखवतामध्ये देत असतात. त्याऐवजी नवरा नवरीच्या संयुक्त नावाने एखाद्या बँकेत ठेव ठेवावी. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत लॅपटॉप, टॅब या सारख्या वस्तू देणे अधिक उत्तम ठरेल. संसारोपयोगी साहित्य देत असताना ” विचारधन ” देण्यासाठी काही प्रसिद्ध संग्राहय पुस्तके रूखवतामध्ये दिली तर ती काळाशी सुसंगत ठरेल. विवाह सोहळा काळाच्या ओघात भरकटत चाललेला आहे. याला मर्यादा असल्या पाहिजेत. सुधारणा व बदल हे काळाशी सुसंगत पाहिजे.  ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे. तो वर्ग आपली प्रतिष्ठा अमाप भपकेबाजीतून दाखवत असतो. ज्यांच्याकडे पैसा नाही तो साधेपणाने लग्न उरकतो. खरा प्रश्न मध्यमवर्गीय व उच्चमध्यम वर्गाचा आहे तो उच्चश्रीमंतांची बरोबरी करायला जातो आणि कर्जबाजारी होतो. प्रथेला जर प्रतिष्ठा द्यायची असेल तर मुलामुलींना चांगले शिक्षण व संस्कार करणा-या व साधेपणाने लग्न करणा-या कुटुंबांना समाजाने प्रतिष्ठा दिली पाहिजे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी आमदार दिगंबर भेगडे म्हणाले की, विवाहसोहळ्यातील अनिष्ट प्रथा बंद कराव्यात. लग्न मुहूर्तावर लावावं, सत्कार शाब्दिक करावे, शाल श्रीफळ ह्या वर खर्च करणे टाळावे, बस्ता कमी लोकांमध्ये करावा, साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी करावे. या विवाह सोहळ्यात राजकीय हस्तक्षेप करू नये, असे ते म्हणाले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमारे पाच हजार स्वयंसेवक रवींद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याच्या आयोजनात सहभाग नोंदवतील असा विश्वास युवा अध्यक्ष रवी शेटे यांनी यावेळी व्यक्त केला. या पुढील काळात वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाचे काम करुन २०१ जोडप्यांचा सहभाग नोंदवतील असा विश्वास, सोहळा समितीचे अध्यक्ष धनवे महारांजीनी व्यक्त केला.

हा सोहळा 50 एकर जागेत पार पडेल, सुमारे सव्वा लाख व-हाडी मंडळी बसतील एवढा मंडप, एक लाख लोकांची जेवणाची व्यवस्था, सुमारे २० हजार वाहनांची पार्कींग व्यवस्था या सोहळ्यासाठी केली जाणार असल्याचे रवींद्र भेगडे यांनी सांगीतले.

सूत्रसंचालन बाळा खांडभोर, अतुल सातकर यांनी केले. प्रास्ताविक रोहिदास महाराज धनवे यांनी केले, स्वागत रवींद्र अप्पा भेगडे यांनी केले. तर आभार नगरसेवक अमोल शेटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.