Vadgaon Maval : नगरसेवक दशरथ केंगले यांचा अखेर मुख्याधिकाऱ्यांकडे राजीनामा

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायत प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक दशरथ दुंदा केंगले यांनी त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे दिला. मात्र केंगले यांनी त्यांचा राजीनामा आपल्याकडे न देता जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यायला हवा, असे मुख्याधिकारी ओगले म्हणाल्या. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर होणार का, याबाबत शहरात उत्सुकता आहे.

दरम्यान, नगरसेवक केंगले निवडणुकीनंतर प्रभागात फिरकलेच नाहीत. कोरोनासारख्या भीषण संकटात देखील ते गायब असल्याचे ‘एमपीसी न्यूज’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताचे तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर केंगले यांनी वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे राजीनामा दिला.

वडगाव नगरपंचायतीचे भाजपाचे नगरसेवक दशरथ दुंदा केंगले हे 2018 रोजीच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून विजयी झाले होते. नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या हद्दीत अनेक विकास कामे करायची आहेत. प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक दशरथ केंगले यांनी त्यांचे घर भाडेतत्वावर देऊन ते भोसरी परिसरात राहत असल्याचे समजते. निवडणूक झाल्यापासून ते नागरिकांच्या सोयीसुविधा  व प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी पुढे आलेच नाहीत. नगरसेवक केंगले यांचा मोबाईल बंद आहे. त्यांनी केवळ निवडणूक लढवून आश्वासने दिली. कार्यवाही शून्य असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.  प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक गायब असल्याने प्रश्न कोणाकडे मांडावे हेच कळत नाही, असे प्रभागातील नागरिक सांगत होते. प्रभागातील लोकप्रतिनिधी अजिबात फिरकत नसल्याने नगरसेवक हरवले असल्याची तक्रार नागरिक करत होते. नागरिकांनी त्यांना फोन केला तर दोन मिनिटात फोन करतो, असे बोलून नगरसेवक केंगले फोन बंद करून ठेवत होते. प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांचा कारभारी प्रभागात नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. नागरिक हवालदिल झाले होते म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे मांडल्या होत्या.

केंगले यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला असला तरी त्यात राजीनामा देण्यामागील कारण नमूद केलेले नाही, असे समजते. केंगले त्यांचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार का, याबाबत शहरात उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.