Vadgaon Maval : कोरोनाच्या संकटात नगरसेवक केंगले गायब; प्रभाग क्रमांक एकचे नागरिक हवालदिल

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक दशरथ केंगले निवडणूक झाल्यापासून प्रभागात फिरकलेले नाहीत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष व सर्व प्रभागाचे नगरसेवक प्रभागात फिरून नागरिकांना कोरोना विषाणूबाबत जनजागृती तसेच गरीब गरजूंना मदत करत दिलासा देत आहेत. मात्र, या संकटाच्या वेळी नगरसेवक केंगले कुठे आहेत, असा सवाल प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांकडून विचारला जात आहे.

प्रभाग क्रमांक 1 नगरसेवक दशरथ केंगले यांनी त्यांचे घर भाडेतत्त्वावर देऊन ते भोसरी परिसरात राहत असल्याचे समजते. निवडणूक झाल्यापासून ते नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी तसेच प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी पुढे आले नाहीत. नगरसेवक केंगले यांचा मोबाईल बंद आहे. त्यांनी केवळ निवडणूक लढवून नागरिकांना आश्वासने दिले. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाही शून्य असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी सुरु आहेत.

वडगाव नगरपंचायतीची स्थापना 3 फेब्रुवारी 2018 रोजी झाली असून नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या हद्दीत अनेक विकास कामे करायची आहेत. प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक गायब असल्याने प्रश्न कोणाकडे मांडावे हेच कळत नाही, असे प्रभागातील नागरिक सांगत आहेत. प्रभागातील लोकप्रतिनिधी अजिबात फिरकत नसल्याने नगरसेवक हरवले असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

नगरसेवक केंगले यांच्याकडे दोन मोबाईल नंबर असून त्यांना नागरिकांनी फोन लावल्यावर दोन मिनिटांत फोन करतो, असे बोलून नगरसेवक केंगले मोबाईल बंद करतात. प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांचा कारभारी प्रभागात उपस्थित नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी तक्रार युवा उद्योजक बजरंग ढोरे, प्रथमेश साबळे, संजय पराठे, सनी कोळेकर, अनिल गुरव, शशिकांत गराडे, संदीप सोनवणे, नितीन पिंगळे,राम परीट, अनिस शेख, मनोहर शिंदे आदींसह अनेक नागरिकांनी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्याकडे केली आहे.

दरम्यान,  9881950431ह्या मोबाईल नंबरवर त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ लागत असल्याने संपर्क झाला नाही. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांची बाजू या बातमीत समाविष्ट करण्यात येईल.

 

 नगरसेवक नगरपंचायतीच्या बैठकीला उपस्थित असतात, पण ते प्रभागात फिरकत नसल्याच्या अनेक नागरिक तक्रार करत आहेत. प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांची जबाबदारी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी घेतली आहे.

सुवर्णा ओगले : मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.