Vadgaon Maval : आता, गायरान जमिनीवरही आले गंडांतर !

अंदरमावळातील उकसान ग्रामपंचायतीने विकली गायरान जमीन ; माहिती अधिकारातून आले उघडकीस

एमपीसीए न्यूज- महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार गायरान जमीन विकता येत नाही किंवा त्यात कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले जाऊ शकत नाही. मात्र अंदर मावळातील उकसान ग्रामपंचायतीने परस्पर एक ग्रामसभेचा ठराव करून विकासासाठी म्हणून गायरान जमिनीची विक्री केल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या प्रकारची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.

अंदर मावळातील उकसान ग्रामपंचायतीने परस्पर एक ग्रामसभेचा ठराव घेऊन दिनांक 15 ऑगस्ट 2014 रोजी विकासाच्या उद्देशाने सर्वे क्रमांक 189 व 191 ह्या जमिनीची विक्री केली. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार गायरान जमीन विकता येत नाही. गायरान जमिनीचा उपयोग गावच्या मूलभूत गरजा तसेच गुरे चारण्यासाठी केला जातो. त्यात कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले जाऊ शकत नाही. महाराष्ट्र शासनाने गायरानासाठी धोरणे ठरवली आहेत. त्यानुसार गायरानासाठी राखीव ठेवलेली जमीन इतरत्र उपलब्ध नसेल तरच आणि गायरानाचे क्षेत्र त्या गावची एकंदर लागवडीसाठी येणाऱ्या क्षेत्राच्या 5% पेक्षा कमी होत नाही याची खात्री झाल्यावरच सार्वजनिक उपयोगासाठी ही जमीन उपलब्ध करून देण्याबाबत विचार व्हावा असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

त्यामुळे उकसान ग्रामपंचायतीने केलेल्या गायरान जमिनीच्या विक्री व्यवहाराची सखोल चौकशी करावी, उकसान ग्रामपंचायत त्वरित बरखास्त करण्यात यावी. सदरच्या जमिनीचा व्यवहार त्वरित थांबविण्यात यावा. सदरची जागा खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, दोषी व्यक्तींची सखोल चौकशी करावी तसेच सदरील जागेचा ताबा घेऊन शासनाने ती जागा सील करावी अशा मागण्या प्रदीप नाईक यांनी केल्या आहेत.

तसेच उकसान ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्याकडून माझ्या जीवितास धोका होण्याची दाट शक्यता असून माझ्या जीवितास धोका झाल्यास उकसान ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक यांना दोषी ठरवण्यात यावे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.