Vadgaon Maval : वडगावमध्ये वाढत आहे गुन्हेगारी; भाजप नगरसेवकाने व्यक्त केली चिंता

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी (Vadgaon Maval) वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अन्यथा वडगाव मधील नागरिक आंदोलन करतील, अशा प्रकारचे निवेदन भाजपचे नगरसेवक प्रवीण चव्हाण यांनी वडगाव पोलिसांना दिले आहे. यावेळी माजी सरपंच नितीन कुडे, वडगाव शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, माथाडी कामगार नेते महेंद्र म्हाळसकर उपस्थित होते.
वडगाव शहरातील दिवसेंदिवस ढासळत्या कायदा सुव्यवस्थेबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून वडगाव शहरामध्ये संघटीत गुन्हेगारी ज्यामध्ये घरफोडी, चोरी व छोटया – मोठया व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली जात असून ती वसूल देखील राजरोसपणे केली जात आहे.
व्यापारी बांधवांकडून गुन्हेगारांच्या दहशतीमुळे अनेक गंभीर स्वरूपाच्या घटनांची नोंद अथवा तक्रार पोलीस स्टेशनकडे केली जात नाही. व्यापारी बांधवाना पोलीस यंत्रणेकडून ठोस सुरक्षेची हमी नसल्यामुळे तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाही.
वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्यालय असून या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालये, कोर्ट, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था या आहेत. त्यामध्ये शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी देखील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे त्रस्त व भयभित आहेत.
तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसणे व त्यांच्यावर कठोर कायदेशीर (Vadgaon Maval) कारवाई करणे गरजेचे आहे, की ज्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी विद्यार्थी /विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची हमी मिळेल असेही चव्हाण म्हणाले.
यापुढे अशा घटना घडल्या, तर वडगाव शहरातील नागरिक व व्यापारी बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. वरील आशयाचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण व डीवायएसपी परिमंडल लोणावळा आदींना देण्यात आले आहे.