Vadgaon Maval : मावळमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- मागील पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा मावळ तालुक्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मावळ प्रांतामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मावळ तालुका भाजपचे अध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी केली आहे.

वडगाव मावळ तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. या पावसाचा मावळ तालुक्याला मोठा फटका बसला असून नदी नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे मावळ भागातील घरांचे, जनावरांचे, पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.  त्यामुळे सदरची परिस्थिती लक्षात घेऊन मावळ प्रांतामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानभरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, पंचायत समितीचे माजी सदस्य व ज्येष्ठ नेते शांतारामबापू काजळे, सरचिटणीस बाबुलाल गराडे, सरचिटणीस यदूनाथ चोरघे, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, वडगाव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, नगरसेवक किरण म्हाळसकर, अॅड विजय जाधव,संजय गांधी निराधार मावळ कमिटीचे अध्यक्ष किरण राक्षे,संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.