Vadgaon Maval : ऐन मुहूर्तावर नवरदेवाने केली हुंड्याची मागणी ; नवरदेवासह चौघांना अटक

एमपीसी न्यूज – लग्नाचा मुहूर्त जवळ आला असताना, ऐनवेळी हुंडा व चारचाकी गाडीची मागणी करीत नवरदेवाने लग्नास नकार दिला. त्याचप्रमाणे नवरी मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी वडगाव मावळ पोलीसांनी नवरदेवासह चौघांना अटक केली. ही घटना मंगळवारी (दि 16 एप्रिल) सायंकाळी वडगाव येथील एका मंगल कार्यालयात घडली.

या प्रकरणी नवरदेव अमोल एकनाथ राऊत, त्याचे वडील एकनाथ सदाशिव राऊत, भाऊ योगेश एकनाथ राऊत ( सर्व रा. भांबोली, ता. खेड, जि पुणे.) व मध्यस्थी सुभाष बाबुराव भोरे (रा वासोली, ता खेड) या चौघांना अटक करण्यात आली असून, नवरीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

एक महिन्यापूर्वी मावळ तालुक्यातील एका गावातील मुलीचा अमोल याच्याशी विवाह निश्चित झालेला होता. ठरल्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता वडगाव येथील मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा आयोजित केला होता. दुपारी साखरपुडा व हळदी समारंभ उरकल्यानंतर नव-यामुलाने बारा तोळे सोने व चारचाकी गाडीची मागणी केली.

सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास विवाहापूर्वी नवरा मुलगा अमोल यांने नवरी मुलीस तू फोनवर का बोलली नाहीस, असा जाब विचारत तुला कापून टाकीन अशी धमकी देत मारहाण केली व तेथून निघून गेला. घडलेला प्रकार समजताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, सहाय्यक फौजदार विश्वास आंबेकर, पोलीस हवालदार बाबा शिंदे, मनोज कदम, गणेश तावरे दाखल झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.

या लग्नकार्यासाठी मुलीच्या वडिलांचे दहा- बारा लाख रूपये खर्च झाले असताना संबंधित आरोपींनी प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी लग्न न करता मुलीच्या कुटुंबांचा विश्वासघात केला, फसवणूक करून नवरी मुलीस मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन लग्न मोडले. त्यामुळे संबंधित आरोपींवर हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत ( हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, सेक्शन 4) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार युवराज बनसोडे करत आहे. दरम्यान, मुलीकडील नातेवाईक व ग्रामस्थ मोठया संख्येने वडगाव मावळ पोलीस ठाण्यासमोर गर्दी करून थांबले होते. त्यांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.