Vadgaon maval :‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘वडगाव मावळ’मध्येही पाच दिवसांचा ‘पूर्ण लॉकडाऊन’

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विषाणूचा संसर्ग वाढू नये. वडगावकरांच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने, साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 (एपिडमिक)मधील तरतुदीनुसार पाच दिवसांचा ‘पूर्ण लॉकडाऊन’ पाळण्यात येणार आहे. हा ‘पूर्ण लॉकडाऊन’ गुरुवारी (दि. 9), शुक्रवार (दि 10), शनिवार (दि 11), सोमवार (दि १३) आणि मंगळवार (दि १४) या दिवशी असणार आहे. यात प्रशासनाकडून गुरुवारी (दि. 9), शुक्रवार (दि 10), सोमवार (दि 13) आणि मंगळवार (दि 14) या दिवशी तर, नागरीकांकडून शुक्रवार (दि 10), शनिवार (दि 11) या दिवशी हा ‘पूर्ण लॉकडाऊन’ असल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीत वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीतील दवाखाने आणि औषध दुकाने सोडून सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील.

वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील सर्व व्यापारी, नागरिक, लोकप्रतिनिधी व पत्रकार बंधू यांनी स्वतःहून गावच्या हितासाठी हा एकमुखी निर्णय घेतला असून याबाबतच्या सह्यांचे निवेदन नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले व वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्याकडे देण्यात आले आहे.

वडगाव शहर हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असल्याने तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, नगरपंचायत,पोलीस ठाणे ही शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी खूपच वर्दळ असते. वडगावमधील व्यापारी व नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बंधूनी एकमुखी निर्णय घेऊन शुक्रवार (दि 10) आणि शनिवार (दि 11) या दोन दिवशी वडगाव मावळ हद्दीत पूर्णपणे लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे.

या कालावधीमध्ये सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत दूध डेअरी, तसेच दवाखाने व औषध दुकाने हेच चालू राहतील तर किराणा दुकान,भाजीपाला, फळविक्री, इत्यादी अत्यावश्यक सेवा दोन दिवस पूर्ण बंद राहतील. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच नागरिक कामानिमित बाहेर येतील. विनाकारण फिरणा-यांना पोलीसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

कोरोना विषाणूचा संसर्ग वडगाव नगरपंचायत हद्दीत वाढू नये. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून सर्वांनी सहकार्य करावे. कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन सर्व नागरिकांकडून करण्यात येत आहे. वडगावकर नागरिकांकडून स्वतःहून एकमुखी निर्णय घेण्यात आल्यामुळे एक औत्सुक्याचा विषय ठरला असून सर्वत्र कौतुक होत आहे.

असा असणार वडगाव शहर लॉकडाउन
याबाबत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी सांगितले कि, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आणि पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून नगरपंचायतीने गुरुवारी (दि. 9) आणि शुक्रवार (दि. 10) तसेच सोमवार (दि.13) आणि मंगळवार (दि.14) या दिवशी संपूर्ण वडगाव शहर लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही नगरपंचायतद्वारे करण्यात येत आहे. या दिवशी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत दुध डेअरी व दवाखाने, औषध दुकाने चालू राहतील. त्याकाळात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून बीएससी पावडर फवारणी करण्यात येणार आहे. याआधी नगरपंचायतीच्या हद्दीत दोन वेळा फवारणी करण्यात आलेली आहे. 14 एप्रिलला तिसरी फवारणी करण्यात येणार आहे.

या चार दिवसांच्या लाॅकडाऊनमध्ये शहराचे सर्व रस्ते बंद करण्यात येणार असून एकच रस्ता येण्या- जाण्यासाठी ठेवण्यात आला आहे. शहरात प्रवेश करताना हात स्वच्छ धुवूनच मगच प्रवेश दिला जाईल. तशी व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर त्या कालावधीत भाजीपाला व फळ विक्रेते, संपूर्ण पोलीस स्टाप, नगरपंचायत सफाई कर्मचारी आधींची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.