_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Vadgaon Maval : शासनाने ‘कर्ज वसुली’साठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढविण्याची गरज

( प्रभाकर तुमकर )

एमपीसी न्यूज – सध्या ‘करोना’ विषाणूचे संकट देशातील प्रत्येकासमोर आहे. यातच आर्थिक वर्षाची अखेर, ‘कोरोना’ला अनुसरून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र लाॅकडाऊन केल्याचे जाहीर केले आहे. पण, बँक, पतसंस्था, फायनान्स कंपन्यां आदींकडून कर्जदारांना कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सपाटा लावला जात आहे. यावर उपाय म्हणून शासनाने ‘कर्ज वसुली’साठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढ दयावी, अशी मागणी नागरिक, कर्जदारांकडून होत आहे.

कोरोनामुळे तालुक्यात नव्हेतर संपुर्ण राज्यात विविध व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. संपूर्ण राज्यातील कंपन्या, रेल्वे तसेच महामार्गावरील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. केवळ गर्दी टाळावी, लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे तालुक्यात विविध क्षेत्रातील उद्योग-व्यवसायासाठी बँक, पतसंस्था, फायनान्स कंपन्यां आदींकडून कर्जदारांनी घेतलेले कर्ज, मार्चअखेर असल्याने संबंधित बँका,पतसंस्था, फायनान्स कंपनी यांचेकडून कर्जवसुलीचा रेटा सुरू आहे.

कर्जदार या मंदीच्या छायेखाली असून या दिवसात जीवनावश्यक सुविधा देणारी दुकाने वगळता सर्व दुकाने, छोटे मोठे उद्योग, कंपन्या 31 मार्च अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढेही आवश्यकता भासली तर या कालावधीत वाढही होऊ शकते. अशा परिस्थितीत कोरोनाही कमी होईना आणि बँकवाले, पतसंस्थेवाले व खासगी सावकार कर्जाच्या हप्त्यासाठी ही मागे हाटेना!, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

मावळ तालुक्यातील शेतकरी, उद्योजक, विविध व्यावसायिक आदीच्या नोटबंदी निर्णयामुळे पुरेते घायाळ झालेले आहेत. आपला व्यवसाय सुधारण्यासाठी पुन्हा विविध बँका, पतसंस्था तसेच तालुक्यात खासगीसावकारांकडून भरमसाठ व्याजाने कर्ज घेतली. आणि आपला व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी पुन्हा उभारी धरू लागलेत एकतर नोटाबंदीनंतर अजूनही परिस्थिती म्हणावी अशी सावरलेली नाही. त्यात ‘कोरोना’ची भर पडली. तालुक्यात कुक्कुटपालन, बिल्डर, फूल उत्पादक, किराणा, सोने-चांदी, कपडे, भांडी असे विविध व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.

लग्न समारंभ, गावचे उत्सव, जत्रा रद्द झाल्या आहेत. काही व्यावसायिकांनी व्यवसायासाठी भाड्याने दुकाने घेतली आहेत. सध्या कोरोनामुळे सर्व व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला असून, कर्ज काढलेला हप्ता भरण्यासही व्यापाऱ्यांकडे पैसे नाहीत. विविध पतसंस्था बँका आदींची वसुलीही जोरात आहे. त्यामुळे विविध व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

लग्न सराईसाठी सोन्या-चांदीचे तसेच कापड व्यापाऱ्यांनी लाखो रुपये किंमतीचा माल भरला होता. परंतु काहींनी लग्नसोहळे पुढे ढकलले, तर काहींनी साध्या पद्धतीने सोहळा उरकला.

‘कोरोना’च्या संकटामुळे निर्माण झालेल्या अवघड परिस्थितीमध्ये संपूर्ण व्यवहारच ठप्प झालेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असून बँका, पतसंस्थाना वर्ष अखेरीमुळे बँकिंग नियमांचा अडथळा आहे. त्यामुळे शासनानेच कर्जवसुलीसाठी किमान दोन महिन्यांची मुदत वाढवणे गरजेचे आहे, अशी त्रस्त नागरिकांची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.