Vadgaon Maval : ‘स्नेहराज’ फाऊंडेशनची स्थापना

एमपीसी न्यूज- अनाथ दु:खीतांचे दु:ख दूर करून त्यांच्या जीवनात सुखाची प्रकाशज्योत देण्याच्या उद्देशाने ‘स्नेहराज’ फाऊंडेशनची स्थापना दस-याच्या मुहूर्तावर वडगाव येथे करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन भाजपाचे नेते वसंत वाणी आणि नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा संतोषी शिळीमकर, माजी पंचायत समिती सदस्य शांताराम काजळे, महेश शिळीमकर, ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा, नगरसेवक राजेंद्र कुडे, नगरसेविका पूजा वहिले, शारदा ढोरे, पूनम जाधव, माजी उपसरपंच विशाल वहिले, ॠतीजा शिळीमकर, आशाताई डुंबरे, माया येवले, मृदुला काजळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनेे उपस्थित होते.

यावेळी अहिरवडेतील किनारा वृद्धाश्रम व आंदर मावळातील कुसवलीच्या शंकरवाडीतील कातकरी बांधवांना मिठाई आणि ब्लॅकेटचे वाटपही करण्यात आले. अहिरवडे येथील किनारा वृद्धाश्रमात अॅड. प्रीती वैद्य सुमारे शंभर आजोबा, आजीचा सांभाळ करीत आहेत. ज्या वृद्ध आई वडिलांची मुले त्यांचे संगोपन करीत नाहीत, अशा आजी आजोबांना मायेचे पांघरूण या निमित्ताने देण्यात आले.

तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. या फाऊंडेशनच्या वतीने आगामी काळात लायब्ररी, माफक दरात विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. संतोष शिळीमकर यांनी प्रास्ताविक केले. सिद्धेश्वर ढोरे यांनी सूत्रसंचालन केले . बाबासाहेब काजळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.