Vadgaon Maval : आंदर मावळातील ऐतिहासिक कांब्रे लेणी प्रकाशात

एमपीसी न्यूज – आंदर मावळातील कांब्रे गावाजवळ असलेली ऐतिहासिक लेणी गडकल्याण प्रतिष्ठान आणि गावक-यांच्या मदतीने प्रकाशझोतात आणण्यात आली. आंदर मावळ प्रांतातील कांब्रे गावाजवळ असलेल्या डोंगराच्या कातळात ही लेणी आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लेणीची स्वच्छता मोहीम राबवून लेणीकडे जाण्याचा दिशादर्शक फलक लावला.

या मोहिमेत गडकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक सुभाष आलम-देशमुख, सभासद गोपाळ भंडारी, गणेश जाधव, अमृता पाटील, रोहित वाघमारे, प्रशांत माने, आनंद भालेराव, हनुमंत नाईकनवरे, रोशन तांदळेकर, सुनील जाधव, राजेंद्र चौधरी, रामदास गायकवाड, बाल शिवभक्त वेदांत आलम-देशमुख, तुषार आलम, स्थानिक ग्रामस्थ रामदास आलम, अनिल आलम, दिनेश आलम, बंडू आलम आदींनी सहभाग घेतला.

मावळ प्रांत प्राचीन इतिहास आणि वास्तू संपन्न प्रदेश आहे. सह्याद्रिच्या कातळ कड्यात, दरी खो-यात इतिहासाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले, लेणी, वाडे आजही दुरवस्थेत अखेरची घटका मोजत असल्याचे निदर्शनास येत आहे. डोंगर द-यातील असा प्राचीन ठेवा काही निवडक लोकांना, गावक-यांनाच माहिती असतो. कांब्रे येथे अशीच एक उपेक्षित लेणी आढळली. या लेणीमध्ये पाण्याची टाकी, लाकडी चौकटी असलेले बांधकाम, दगड मातीतील भिंती, दगडात कोरलेल्या क्रीडाकृती आणि विविध प्रकारच्या वापरातील वस्तू आढळल्या.

गडकल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक सुभाष आलम-देशमुख म्हणाले की, “ही दुर्लक्षित लेणी सर्वांच्या परिचयाची व्हावी यासाठी गडकल्याण प्रतिष्ठान यांच्या वतीने नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत लेणीकडे जाणा-या वाटेवर मार्गदर्शक फलक लावण्यात आले. गडकल्याण प्रतिष्ठान यांच्या या मोहिमेमुळे आंदर मावळातील उपेक्षित लेणी सर्वांसमोर आली. आंदर मावळात अश्या ब-याच वास्तू असून त्या गडकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने आणि अनेक दुर्गप्रेमी संस्थांच्या मदतीने त्यांचे संवर्धन करता येईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.