Vadgaon Maval : काल्याच्या किर्तनाने कार्तिक उत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान व वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी कालभैरवनाथ जयंती (कार्तिक) उत्सव उत्साहात पार पडला. काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता झाली.

कालभैरवनाथ जयंती उत्सवाच्या निमित्ताने पुणे व नगर जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार यांना निमंत्रीत करण्यात आले. देवजन्माचे कीर्तन ह भ प सतीश महाराज काळजे यांचे झाले व काल्याचे कीर्तन ह भ प तुषार महाराज दळवी (भाजे मावळ) यांनी गवळणीपर अभंग घेऊन या महोत्सवाची सांगता केली. काल्याच्या किर्तनानंतर देवस्थानचे विश्वस्त सल्लागार ॲड तुकाराम काटे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक सजावट भैरवनाथ शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर यांनी केले होते.

उत्सव काळात नऊ दिवस पहाटे पाच वाजता रोजच्या मान्यवरांच्या हस्ते अभिषेक होत असे. सायंकाळी पाच वाजता हरिपाठ व सात ते नऊ किर्तन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. किर्तनासाठी साथ, काकडा आरती उत्सव समितीचे टाळकरी नित्यनेमाने हजर राहिले.

या कीर्तन महोत्सवामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, ॲड. अशोक ढमाले, ॲड. तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव व सुनीता कुडे आदींसह ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.