Vadgaon Maval : केशवनगर मधील नागरिकांची वडगाव मावळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पादचारी पुलाची मागणी

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ मधील केशवनगर आणि सांगवी परिसरातील नागरिकांना वडगाव मावळ रेल्वे स्थानकावर येण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. ही बाब अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी पादचारी पूल उभारून नागरिकांची सोय करण्याऐवजी याठिकाणी नवनवीन क्लुप्त्या वापरून प्रवाशांची आणि नागरिकांची गैरसोय करण्याचा प्रकार रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांना तसेच केशवनगर परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

केशवनगर भागातील नागरिकांना वडगावच्या मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी सुमारे दोन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. रस्त्याने जाण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने नागरिक जवळचा मार्ग म्हणून वडगाव रेल्वे स्थानकाकडून जाणे पसंत करतात. तसेच केशवनगर भागातील नागरिकांना रस्त्याने रेल्वे स्टेशनवर यायचे असेल तर सुमारे दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. हे अंतर खूप लांब आहे. त्याऐवजी रेल्वे प्रशासन आणि नगर पंचायतीच्या माध्यमातून एक पादचारी पूल उभारल्यास हे अंतर कमी होऊन अगदी 500 मीटर एवढेच होईल. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन याठिकाणी पादचारी पूल उभारल्यास नागरिकांची तसेच प्रवाशांची सोय होऊ शकते. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मध्यंतरी मध्य रेल्वेचे ऑटो सिग्नलिंगचे काम सुरु असताना वडगाव मावळ येथील रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंनी खोल खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच रेल्वे प्रवासी ज्या मार्गाने जातात त्या मार्गावर मोठमोठी काट्यांची झाडे तोडून टाकण्यात आली असून एक बॅरिकेड लावण्यात आले आहे. त्यामुळे केशवनगर भागातील नागरिक आणि रेल्वे प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत. नागरिकांना सोय उपलब्ध करून देण्याऐवजी नागरिकांची गैरसोय करणा-या प्रशासनाला कोण जाग आणणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

केशवनगर भागातील विद्यार्थी शाळेसाठी वडगाव बाजारपेठेच्या बाजूला जातात. बाजारपेठेकडे जाताना जवळचा मार्ग म्हणून विद्यार्थी सुद्धा रेल्वे रूळ ओलांडणेच पसंत करतात. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे रेल्वे रूळ ओलांडणे धोक्याचे आणि बेकायदेशीर असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येते तर दुसरीकडे प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करून त्यांची गैरसोय केली जाते. तीन किलोमीटर घालाव्या लागणा-या वळसा मार्गावर खासगी वाहने, पीएमपीएमएल बस असे अनेक पर्याय उपलब्ध असताना आम्ही रेल्वेकडे का जावे असाही प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

याबाबत वडगाव-कातवी नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे म्हणाले, ” केशवनगर भागातील नागरिकांना केशवनगर ते भाजी मंडई असा जोडणारा पादचारी पूल हवा असेल, तर त्याबाबत नागरिकांनी नगरपंचायतीला अर्ज द्यावा. त्यानंतर ठराव करून नगरपंचायतीच्या वतीने रेल्वे प्रशासनाला अर्ज दिला जाईल. सध्या असलेल्या रस्त्यावर भुयारी पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे रूळ न ओलांडता त्या मार्गाने यावे. सध्या त्याबाबत कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.