Vadgaon Maval : ‘लॉकडाऊन’मुळे पहाटेच्या मुहूर्तावर बांधली ‘रेशीमगाठ’ !

एमपीसी न्यूज : लॉकडाऊनच्या संकटात व-हाडी मंडळींची गर्दी टाळण्यासाठी मावळ तालुक्यातील अनके विवाह समारंभ पुढे ढकलण्यात आले आहेत. तर सामूहिक विवाह सोहळे यंदा रद्द करण्यात आले आहेत. लॉकडाऊनचे गांभीर्य लक्षात घेत मावळ तालुक्यातील एक विवाह चक्क पहाटेच्या मुहूर्तावर व तोही घरातच पार पडला. या वेळी ना वऱ्हाडींची गर्दी, ना जेवणाच्या पंगती, ना नवरदेवाची मिरवणूक निघाली. त्यामुळे या पहाटेच्या लग्नाची मावळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू झाली. त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली. यामध्ये प्रामुख्याने ज्यांचे लग्न ठरले, मुहूर्त काढले ते अडचणीत सापडले. संचारबंदीमुळे थाटामाटात लग्नास परवानगी मिळेना. मंदिरात विवाह उरकावा तरी गावकऱ्यांची गर्दी होण्याची भीती. कोरोनाची दहशत आणि पोलीसांची धास्ती वेगळीच. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी घरात विवाह समारंभ उरकून घेतले.

तसे पाहता विवाह मुहूर्ताची वेळ सकाळी, दुपारी आणि सायंकाळी असते. मात्र, सध्याच्या कोरोनासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत गर्दी टाळण्यासाठी एका विवाह सोहळा चक्क पहाटेच्या मुहूर्तावर उरकला. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला ना वाजंत्री होते ना नवरदेवाची मिरवणूक. लग्न पत्रिकांचे वाटप झाले नसल्याने वऱ्हाडींचा मेळाही रंगला नाही. जेवणाच्या पंगतीही उठल्या नाहीत. वधू आणि वराच्या घरातील मंडळींच्या उपस्थिती मंगलाष्टके म्हणत सोशल डिस्टंगसिंगचे पालन करीत हा विवाह समारंभ पार पडला.

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी व लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांच्या मदतीसाठी मावळ तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था पुढे येत. तालुक्यात गेली अनेक वर्षांपासून सामूदायिक विवाह सोहळे पार पाडत आहेत. मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे  लोणावळा येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, वेहेरगाव येथील श्री एकवीरा जोगेश्वरी प्रतिष्ठान व श्री दुर्गापरमेश्वरी प्रतिष्ठान, वडगाव मावळ येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आणि मावळ प्रबोधिनी व मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेले सामूहिक विवाह सोहळे यंदा रद्द करण्यात आले आहेत.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव या संस्थेचा सामूदायिक विवाह सोहळा रविवारी (दि.19) होता. या सोहळ्याचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मात्र, या संस्थेने विवाह सोहळा रद्दची घोषणा अजून केलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.