Vadgaon Maval : मावळ तालुका भाजपचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर निषेध मोर्चा

सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्या कामकाजावर आक्षेप

एमपीसी न्यूज- सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे ऐकून सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी सहकार कायदा मोडीत काढण्याचे काम चालू केल्याचा आरोप करून या निषेधार्थ मावळ तालुका भाजपच्या वतीने सहाय्यक निबंधक कार्यालयावर गुरूवारी निषेध मोर्चा काढण्यात आला.

तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, गणेश गायकवाड, जितेंद्र बोत्रे, उपसभापती दतात्रय शेवाळे, संभाजी टेमगिरे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, चंद्रशेखर भोसले, नगरसेवक प्रवीण चव्हाण, रमेश गायकवाड, रवींद्र घारे, सुनील चव्हाण, प्रकाश देशमुख, यदूनाथ चोरघे, दिनेश ढोरे, शामराव ढोरे, किरण भिलारे, महेंद्र म्हाळसकर, भूषण मुथा, खंडू भिलारे आदी यावेळी उपस्थित होते.

मावळ तालुका देखरेख संघाच्या संचालकांना विश्वासात न घेता आमदाराच्या सांगण्यावरून संघ बरखास्त केला, तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी ठराव करून प्रतिनिधी यांची निवड केली जाते.त्या निवडीमध्ये संचालक व सचिवांना मारहाण करून बोगस ठराव केले. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत चुकीच्या पध्दतीने अध्यक्षपदाची निवड केली जाते. आदीसह अन्य कारणावरून हा मोर्चा काढण्यात आला. या बाबत लेखी निवेदन देण्यात आले.

या वेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले ” सत्तेच्या जोरावर सुडबुध्दीने काम चालू आहे. सहकार कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिका-यांनी प्रामाणिक काम करावे” कुणाचे ऐकुन चुकीचे काम केले तर तीव्र आंदोलनाचा इशारा भेगडे यांनी दिला. रवींद्र भेगडे म्हणाले ” कायद्याला धरून काम करावे. दडपशाहीचा वापर करून कामे केल्यास रस्त्यावर उतरू”

बाळासाहेब नेवाळे म्हणाले ” सोसायटीचे संचालक, सचिव यांना मारहाण करणे, पळवुन नेणे, आमदाराच्या सांगण्यावरून चुकीचे काम करणे. यामुळे सहकार कायदा मोडीत निघेल”

यावर सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ” कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत काम केले आहे. सहाय्यक निबंधकाला अर्धन्यायिक स्वरूपाचे अधिकार असतात. त्यांचा निर्णय कोणास मान्य नसेल तर अपिल करावे. न्यायालयातून योग्य आदेश आणावा. कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडून मी काम केले नाही”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.