Vadgaon Maval : डोंगर पठारावरील सुविधांसाठी मावळ पठार सुविधा समितीतर्फे दोन लाख रुपयांचा निधी

एमपीसी न्यूज- मावळ विचार मंच संचलित मावळ पठार सुविधा समितीने गुरुवारी (दि. 28) आयोजित केलेल्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाच्या तिकीटविक्रीमधून जमा झालेला दोन लाख रुपयांचा निधी मावळच्या दुर्गम डोंगर पठारावरील वनवासी बांधवांच्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेकरीता प्रदान करण्यात आला.

मावळच्या दुर्गम डोंगरपठारावरील वनवासी बांधवांच्या व मूक पशुधनाच्या पिण्याचे पाणी, औषधोपचार, सौर उर्जा प्रकल्प, शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजांच्या पुर्ततेसाठी मावळ विचार मंच संचलित मावळ पठार सुविधा समितीने प्रसिद्ध गायक, कवी संदीप खरे व सलील कुलकर्णी यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा आनंद सुमारे दीड हजार रसिकांनी घेतला.

यावेळी आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 2 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी मनोगत व्यक्त करताना मावळ विचार मंचच्या उपक्रमाचे कौतुक केले.

डोंगरपठारावरील नागरिकांचे पिण्याचे पाणी, प्राथमिक औषधोपचार पेटी, सौर दिवे, लहान मुलांचे शिक्षण यासाठी खर्च केले जाणार आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात समितीचे उपाध्यक्ष प्रसाद पिंगळे यांच्याकडून पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी दहा हजार रुपये पंतप्रधान सहायता निधीसाठी व पाच हजार रुपये वडगाव मावळ येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेला गडकिल्यांच्या डागडूजीसाठी देण्यात आले.

स्वागत समितीचे अध्यक्ष कल्पेश भोंडवे यांनी केले. प्रस्ताविक मावळ विचार मंचचे संस्थापक भास्कर म्हाळसकर यांनी केले. सूत्रसंचालन भूषण मुथा व अनंता कुडे यांनी तर आभार अतुल राऊत यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.