Vadgaon Maval : मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिरात डोंगरवाडी गावातील जनावरांची तपासणी

एमपीसी न्यूज- गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व कला, वाणिज्य, बीबीए महाविद्यालय वडगांव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरमाथ्यावरील डोंगरवाडी गावात आज, शनिवारी मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात पशुधन विकास विभागाचे निवृत्त सहाय्यक आयुक्त डॉ. जवाहरलाल साळुंखे यांनी जनावरांची तपासणी करून मार्गदर्शन केले. गावातील घराघरातील गोठ्यामध्ये जाऊन डॉ. साळुंखे यांनी जनावरांची तपासणी केली. तसेच रानात सोडलेल्या जनावरांचीही तपासणी करण्यात आली. जनावरांना विशेषत: खुरकुद (Foot and mouth disease) ची बाधा दिसुन आली

या शिबिरामध्ये खुरकुद आजारावर उपचार करण्यात आले. गावातील ५० ते ६० जनावरांना जंत नाशक औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. म्हैस, गाय यांचे वांझपणावर उपचार करण्यात आले. दूध कमी झालेल्या गायी म्हैस यावर उपाय सांगण्यात आले. जनावरांचे आरोग्य चांगले राहण्याकरीता मार्गदर्शन, उपचार व सूचना करण्यात आल्या. डोंगरवाडी गावातील जनावरे कुपोषित असल्याचे दिसुन आल्याने डॉक्टरांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

या शिबिराला कला,वाणिज्य, बीबीए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र जाधवर, किरण चिमटे, अक्षय औताडे उपस्थित होते. यापुढे संस्थेच्या वतीने मावळातील आदिवासी दुर्गम वाड्या वस्त्यांवर मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे पदाधिकारी विशाल शिंदे व नितीन चव्हाण यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.